Latest

Novak Djokovic : जोकोव्हिच, साबालेंका, गॉफची तिसर्‍या फेरीत धडक

Shambhuraj Pachindre

मेलबर्न; वृत्तसंस्था : पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोव्हिच, त्सिसिपस, तर महिला एकेरीतील विद्यमान विजेती आर्यना साबालेंका, अमेरिकेची कोको गॉफ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. सर्बियाचा दिग्गज खेळाडू जोकोव्हिचने डेनिस पॉपिरिनला चार सेटस्मध्ये नमवले. बेलारूसच्या साबालेंकाने रॉड लेव्हर एरेनावर झालेल्या लढतीत 16 वर्षीय ब्रेंडा फ्रुव्हिरोव्हाचा 6-3, 6-2 अशा फरकाने फडशा पाडला. (Novak Djokovic)

साबालेंकाचे जेतेपद कायम राखण्याचे ध्येय असून, यापूर्वी 2013 मध्ये व्हिक्टोरिया अझारेंकाला अशी कामगिरी साकारणे शक्य झाले होते. यंदा साबालेंकाचा या स्पर्धेत अद्याप कस लागलेला नाही. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतही तिच्यासमोर इला सिडेल या पात्रताधारक खेळाडूचे सोपे आव्हान होते. साबालेंकाने त्यावेळी केवळ एकच गेम गमावत अवघ्या 53 मिनिटात तिचा फडशा पाडला. झेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडालादेखील 67 मिनिटे प्रतिकार करता आला. (Novak Djokovic)

साबालेंकाने 2023 मध्ये उत्तम यश मिळवले. तिने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर पॅरिस व विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली, तर अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये तिला कोको गॉफविरुद्ध अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता पुढील फेरीत तिची लढत युक्रेनची लेसिया व स्पेनची रॅबेको यांच्यातील विजेतीशी होईल. अन्य लढतीत कोको गॉफने आपलीच राष्ट्रीय सहकारी कॅरोलिन डॉलेहिडेला 7-6 (7/2), 6-2 अशा फरकाने नमवले. चौथ्या मानांकित गॉफला या विजयासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत.

स्टेफानोसचा संघर्षमय विजय

या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोव्हिचने डेनिस पॉपिरिनचा चार सेटस्मध्ये पराभव केला. जॉन सिन्नरने डे जाँगचा 6-2, 6-2, 6-2 अशा सलग सेटस्मध्ये फडशा पाडला. रुबलेव्हने अमेरिकेच्या रुबँक्सला 6-4, 6-4, 6-4 अशा फरकाने नमवत आपली आगेकूच कायम राखली. ऑस्ट्रेलियाच्या थॉम्पसनने स्टेफानोस त्सिसिपसविरुद्ध पहिल्या सेटमध्ये धमाकेदार बाजी मारली होती; पण नंतर त्याला हाच टेम्पो कायम राखता आला नाही. ही लढत स्टेफानोसने 4-6, 7-6, 6-2, 7-6 अशा फरकाने जिंकत जोरदार कमबॅक नोंदवले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT