Latest

माफियाच्या दहशतीचा अंत; मुख्तारवर सरकारने विष प्रयोग केल्याचा आरोप!

दिनेश चोरगे

लखनौ; वृत्तसंस्था : यूपीत सरकार सपचे असो, की बसपचे… मुख्यमंत्री मुलायमसिंह असू देत, की मायावती… मुख्तार अन्सारीसह यूपीवर माफिया टोळ्यांचा वरचष्मा कायम राहिलेला होता. मुंबईवर जसा दाऊद इब्राहिम या गुंडाचा दरारा होता, तसाच यूपीत अतीक अहमद असो, की मुख्तार अन्सारी… आपापल्या भागातून या माफियांचा एकछत्री अंमल होता. अतीक अहमदच्या खात्म्यासह त्याच्या टोळीची वाराणसी भागातील दहशतही संपुष्टात आली आहे. अतीक कारागृहात असतानाच संपला किंवा संपविण्यात आला. मुख्तारही कारागृहात असताना मरण पावलेला आहे. तो हृदयविकाराने नव्हे, तर विष प्रयोगामुळे मरण पावला, यंत्रणेचाच त्याच्या मृत्यूत हात आहे, असा आरोप मुख्तारचा मुलगा उमर याने उघडपणे केलेला आहे. त्यावरून मुख्तारच्या मृत्यूची चौकशीही सुरू झालेली आहे…

यानिमित्ताने भर विधानसभेत यूपीतील भाजप सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेली एक गर्जना आठवते… ती म्हणजे, 'माफियाओं को मैं मिट्टी में मिला दुंगा!' बिकरू पोलिस हत्याकांडातील विकास दुबेचे एन्काऊंटर, अतीक आणि मुख्तारच्या मृत्यूनंतर यूपीतील कारागृहात असलेले आणखी काही माफिया कारागृहातच संपविले जातील, असे काही जाणकार सांगत आहेत.

डॉन मुख्तार अन्सारी तसा बडी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला; पण भाईगिरीच्या आकर्षणातून स्वत:ला दूर ठेवू शकला नाही. किती तरी हत्या केल्या. किती अपहरणे केली आणि किती लोकांना आयुष्यातून उठविले. मुख्तारच्या पापांची मालिका शिशुपालासारखी सुरूच होती.
ठेकेदार मन्ना सिंह यांची हत्या त्याला भोवली. पापांची शंभरी भरली. मन्नाच्या हत्येनंतर मुख्तारच्या पतनाची प्रक्रिया सुरू झाली. मऊतील गाझीपूर चौकात 29 ऑगस्ट 2009 रोजी मन्ना सिंह यांची हत्या झाली. मुख्तार हा मुख्य आरोपी होता. खटल्यातील मुख्य साक्षीदार रामसिंह मौर्य यांनाही मग मुख्तारने संपविले. याउपर 7 वर्षांपूर्वीपर्यंत मुख्तार स्वत:ला अजिंक्य मानत होता. खरे तर या राज्यातील चित्रही तसेच होते; पण 2017 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले आणि… यूपीत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर कायद्यात किती ताकद असते, हे मुख्तारला कळले.

विकास दुबेच्या एन्काऊंटरने राज्यातील गुन्हेगारी टोळ्या हादरलेल्या होत्याच. अतीक व त्याच्या कुख्यात भावाच्या हत्येने पोलिस प्रशासनाचा दरारा आणखीच वाढला. मुख्तारविरुद्धही कायद्याचा फास हवा तसा आवळला गेला; अन्यथा शिक्षा व मुख्तार हे एका नदीचे दोन काठ होते. योगींच्या कार्यकाळात मात्र मुख्तारला त्याच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळत गेली. याआधी तर मुख्तार कारागृहातूनही लोकांचे खून पाडत असे.

मुलायमसिंह असू देत, मायावती वा अखिलेश कुणीही मुख्तारला रोखू शकत नव्हते. मुख्तारला वाचविण्यासाठी सप सरकारने पोलिस उपअधीक्षक शैलेंद्र सिंह यांना इतका त्रास दिला होता की, त्यांच्यावर अखेर पोलिस खात्याचा राजीनामा देण्याची वेळ ओढविली.

भाजप आमदाराच्या हत्येनंतर…

मुख्तारने भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या केली. यानंतर तर पूर्वांचलात मुख्तार म्हणजेच सरकार होते. 'कौम के रहनुमा' अशी स्वत:ची प्रतिमा तयार करण्यातही तो यशस्वी ठरला होता. अन्सारीचे प्रशंसक त्याला दुसरा लादेनही म्हणत असत. मुख्तार 5 वेळा आमदार होता. तीनवेळा तर तो कारागृहातून लढला आणि जिंकला होता. पूर्वांचलमधील कोणतेही सरकारी कंत्राट मुख्तारच्या मंजुरीशिवाय कुणाला मिळत नसे.

माझ्यावर स्लो पॉईझनिंग

मुख्तार अन्सारी याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, माझ्यावर कारागृहातील जेवणातून स्लो पॉईझनिंग (हळूवार विषप्रयोग) सुरू असल्याचा आरोप केला होता, हे येथे उल्लेखनीय!

मुख्तारचे गुन्हेगारी रेकॉर्ड

गँगस्टर मखानू सिंहच्या टोळीत तो सुरुवातीला सदस्य होता. 1990 मध्ये मुख्तारने स्वत:ची गँग बनविली. 61 गुन्हे मुख्तारविरुद्ध दाखल होते. 15 खून प्रकरणांत मुख्तार मुख्य आरोपी होता. ब्रजेश सिंह टोळीशी मुख्य स्पर्धा होती. मुन्ना बजरंगी हा यूपीचा कुख्यात गुंड मुख्तारचा पंटर होता. 2002 मध्ये बृजेशने मुख्तारचे 3 हस्तक मारले. बृजेशचे निकटवर्तीय म्हणून 2005 मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह 6 जणांचे हत्याकांड मुख्तारने घडवून आणले. एके-47 चा वापर त्यात झाला होता. कृष्णानंद राय यांनी 2002 मध्ये विधानसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारीचा पराभव केला होता. तो जिव्हारी लागल्याने मुख्तार याने कारागृहातून हे हत्याकांड घडविले होते. नंतर राय हत्याकांडातील मुख्य साक्षीदार शशिकांत यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.

माझ्या पित्याचा खून : उमर

स्लो पॉईझनिंगने माझ्या पित्याचा खून झाला आहे. चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्तारचा मुलगा उमर याने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही मुख्तारच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात हाय अलर्ट, वाढीव कुमक

शुक्रवारची नमाज आणि बांदा कारागृहातील मुख्तारच्या मृत्यूमुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद युसूफपूर येथील निवासस्थानाहून मुख्तारचा जनाजा नियोजित आहे. कालिबागमधील कौटुंबिक कब्रस्तानात मुख्तारसाठी खड्डाही तयार आहे.

बडी कौटुंबिक पार्श्वभूमी

मुख्तार अन्सारीचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी 1926-1927 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि नंतर मुस्लिम लीगचे (स्वतंत्र पाकिस्तान मिळविणारा पक्ष) अध्यक्ष होते.
सुबानउल्लाह हे त्यांचे पुत्र. सुबानउल्लाह हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्यांनी वडिलांच्या नावावरुन ज्या मुलाचे नामकरण केले तोच हा कुख्यात मुख्तार…
मुख्तारचे दोघे भाऊही राजकारणात आहेत. सिबकतुल्लाह दोनवेळा आमदार झालेत, तर तिसरा भाऊ अफजाल अन्सारी हे पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता अफजाललाही 4 वर्षे शिक्षा झालेली आहे.
मुख्तारचा एक मुलगा अब्बास हा मऊमधून गतवर्षीच विधानसभेची पोटनिवडणूक जिंकला होता.
एकेकाळी नेमबाजीत त्याने खूप नाव कमावले होते. अब्बासही सध्या कारागृहात आहे. दुसरा मुलगा उमर हा हेट स्पीच प्रकरणात फरार आहे.

योगी-मुख्तार : जुनी खुन्नसही

मुख्तार 786 क्रमांकाच्या खुल्या जिपमधून फिरायचा. 2005 मध्ये मऊत भीषण हिंदू-मुस्लिम दंगल झाली. ती मुख्तारनेच भडकावल्याचा आरोप होता. दंगलीच्या निषेधार्थ योगी आदित्यनाथ निदर्शने करण्यासाठी गोरखपूरहून मऊला रवाना झाले होते. मऊच्या अलीकडे दोहरीघाटातच योगींचा ताफा अडविला गेला.

पुढे 2008 मध्ये आझमगड जिल्ह्यात दहशतवादाचे धागेदोरे सापडायला लागले आणि योगी आदित्यनाथ यांनी त्याविरुद्ध मार्च जाहीर केला. डीएव्ही कॉलेज मैदानाकडे योगी आदित्यनाथ रवाना होत असताना त्यांच्या ताफ्यावर अचानक हल्ला झाला. हा हल्लाही मुख्तार यानेच केला होता, असे सांगण्यात येते.

योगी सरकारच्या काळात…

योगी आदित्यनाथ सरकारमध्ये पोलिसांनी मुख्तारविरुद्ध प्रत्येक केस टाईट केली.
योगी सरकारने मुख्तारच्या अवैध संपत्तीवर कायद्याचा बुलडोझर फिरवला.
अन्सारी टोळीच्या सदस्यांविरुद्ध 155 गुन्हे दाखल केले गेले.
मुख्तारची 586 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली.
2,100 वर अवैध व्यवसाय बंद पाडण्यात आले.
गेल्या 18 महिन्यांत मुख्तारला 8 प्रकरणांत शिक्षा सुनावण्यात आली.
मुख्तारची पत्नी अफशा हिच्यावर 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ती फरार आहे.
मुख्तारचा एक मुलगा कारागृहात आहे, तर दुसरा जामिनावर आहे.

जेलरलाच बंदूक लावली! जेलमध्येच तलाव बनविला!

निवृत्त कारागृह अधीक्षक एस. के. सिन्हा 2003 चा एक किस्सा सांगतात, लखनौ कारागृहात मुख्तारला भेटायला काही सशस्त्र लोक आले. मी हरकत घेतली. त्यावर 'अरे मैं जेलमेंभी कट्टा साथ रखता हूँ,' असे सांगत मुख्तारने थेट माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखले होते. गाझीपूर कारागृहात त्याच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट बनविलेले होते. मुख्तारने आवडीचे ताजे मासे खाता यावेत म्हणून कारागृहातच तलावही खणून घेतला होता.

1,200 कोटींची मालमत्ता; 2,100 कोटींचे काळे धंदे!

गणेश मिश्रा याच्या नावावर मुख्तारने अनेक बेनामी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. विविध यंत्रणांच्या माहितीनुसार, मुख्तारकडे 1,200 कोटींची संपत्ती होती. त्यापैकी 608 कोटींची मालमत्ता जप्त किंवा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. 2,100 कोटींचे तर मुख्तारचे ब्लॅक मार्केट होते. तेही उद्ध्वस्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT