पुढारी ऑनलाईन डेस्क : बघता बघता वर्षं सुरू होऊन सरतही आलं. या दरम्यान अनेक चांगल्या- वाईट अशा वेगवेगळ्या घटनांचा हे वर्षं साक्षीदार आहे. यावर्षी अनेक सेलिब्रिटी हे जग सोडून गेले. आपण कलाक्षेत्रातील अनेक उत्तमोत्तम दिग्गजांना यावर्षी गामावलं आहे. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी :
लता मंगेशकर : यावर्षी ज्यांच्या निधनाने प्रत्येक भारतीयाच्या मनाला यातना झाल्या असं व्यक्तिमत्त्व म्हणजे लता मंगेशकर. कित्येक दशकं लतादीदीनी आपल्या आवाजाने प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य केलं आहे. पण 6 फेब्रुवारी 2022 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदी हे जग सोडून गेल्या. न्यूमोनिया आणि कोविडमुळे लतादीदी यांची प्रकृती आणखी खालवत गेली होती.
बप्पी लहीरी : गोल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले गायक, संगीतकार बप्पीदाही 2022 मध्ये हे जग सोडून गेले. 1980 आणि 90 च्या दशकात डिस्को संगीताचा ट्रेंड खऱ्या अर्थाने सेट करणारे कलाकार आपण बप्पी यांना म्हणू शकतो.
के के : अत्यंत कमी वयात या जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांमध्ये केके म्हणजेच कृष्णकुमार कुनथ यांच नावही दुर्दैवाने घ्यावं लागेल. स्टेजवर परफॉर्म करता करता केके यांना ह्रदयाविकराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच केके यांनी आपल्यातून निरोप घेतला होता. केकेच्या मेलोडियस आवाजाने जवळपास प्रत्येकालाच वेड लावलं होतं.
पंडित बिरजू महाराज : आपल्या कथ्थक नृत्याने प्रत्येकाला मोहून घेणारे बिरजू महाराजही यावर्षी आपल्यातून निघून गेले. नृत्य आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांची उत्तम जाण असलेला कलाकार म्हणून बिरजू महाराजांचा लौकिक होता. 85 व्या वाढदिवसाला केवळ एक महिना बाकी असताना त्यांचं यावर्षी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं.
पंडित शिवकुमार शर्मा : संतूर वादनाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे कलाकार म्हणून शिवकुमार शर्मा यांच नाव घेता येईल. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. 'लम्हे', चाँदनी या सिनेमानाही त्यांनी संगीत दिल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संतूर वादन क्षेत्रात मोठी हानी झाल्याचं बोललं जात आहे.
राजू श्रीवास्तव : अगदी नुकताच राजू श्रीवास्तव यांनी आजारपणामुळे जगाचा निरोप घेतला. जीममध्ये वर्कआऊट करत असताना राजू यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर ते बरेच दिवस आयसीयूमध्ये होते. ते बरे होण्याची आशा असतानाच हार्ट अटॅकने त्यांचं जाणं चाहत्यांना धक्का देणार ठरलं.
पुनीथ राजकुमार : कानडी सिनेमाचा उत्तम अभिनेता अशी ख्याती असलेला अभिनेता पुनीथ राजकुमार यांचं निधन कानडी चाहत्यांना धक्का देणारं ठरलं. जीमध्ये वर्क आऊट केल्यानंतर काहीच वेळात पुनीथ यांना ह्रदयाविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. अत्यंत कमी वयात या गुणी अभिनेत्याची एक्झिट अनेकांना दुखी करून गेली.
रमेश देव : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहात पाडलं. त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
तब्बसूम : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निवेदक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तब्बसूम यांच अलीकडेच निधन झालं. 'फूल खिले है गुलशन गुलशन' या शो मुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. ह्रदयाविकाराच्या धक्क्याचं निमित्त होऊन तब्बसुम यांनी या जगाचा निरोप घेतला.
विक्रम गोखले : नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात अभिनयाची मुशाफिरी करणारे विक्रम गोखले यांचं नुकतंच निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. बॅरिस्टर नाटकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या शिवाय हिंदी सिनेमातील निवडक व्यक्तिरेखांमध्ये त्यांनी खास छाप पाडली.