Latest

पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला आदर्श मानत नाही : उमरान मलिक

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीने उमरानचा वेग आणि गोलंदाजी माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूससारखीच असल्याचे म्हटले आहे. यावर उमरान मलिक याने प्रतिक्रिया दिली आहे. आपण वकार युनूसला आदर्श मानत नसल्याचे तो म्हणाला. मलिक भारतीय गोलंदाजांना आपला आदर्श मानत आला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 15 व्या हंगामात नवोदित गोलंदाजांपैकी सर्वात जास्त चर्चा उमरान मलिकची झाली. सनरायझर्स हैदराबादसाठी वेगवान गोलंदाजी करणार्‍या मलिकने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची भारतीय टी-ट्वेंटी संघातही वर्णी लागली आहे. जगभरातील दिग्गज त्याला भारतीय क्रिकेटमधील 'उगवता तारा' म्हणत आहेत. अनेक महान गोलंदाजांशी त्याची तुलना केली जात आहे. एका कार्यक्रमात उमरानने सांगितले, आपण कधीच पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूसचे अनुकरण केले नाही. माझ्या गोलंदाजीची शैली आणि हातांची हालचाल नैसर्गिक आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना मी माझा आदर्श मानतो. मी खेळताना त्यांचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचो.

यशाने आणि प्रसिद्धीत वाहून जाण्यात काही अर्थ नाही. जे नशिबात असेल ते होईल. मला माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. मला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. आपण सर्व पाच सामने जिंकावेत यासाठी मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. चांगली कामगिरी करून संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची माझी इच्छा आहे, असेही उमरान पुढे म्हणाला.

आयपीएल स्पर्धेत जम्मूच्या या 22 वर्षीय वेगवान गोलंदाजाने आपल्या धडाकेबाज गोलंदाजीने सर्वोत्तम फलंदाजांना अडचणीत आणले होते. ताशी 150 किलोमीटर या वेगाने सातत्याने गोलंदाजी करून त्याने प्रसिद्धी मिळवली. या स्पर्धेतील सर्वात वेगवान (ताशी 156.9 किमी) चेंडू टाकण्याचा मान त्याने मिळवला आहे. उमरानने 14 सामन्यांमध्ये 22 बळी मिळवले होते. उमरान मलिकने आयपीएलमधील अनुभवदेखील सांगितले आहेत. संपूर्ण देशातून मला जे प्रेम आणि आदर मिळत आहे त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. नातेवाईक आणि इतर लोक घरी येतात, त्यामुळे खूप छान वाटते आहे. आयपीएलनंतर मी थोडा व्यस्त झालो आहे. पण, मी कधीही सराव चुकवत नाही, असे तो म्हणाला.

उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. 9 जूनपासून दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील पहिला सामना होणार आहे.

उमरान मलिक म्हणतो…

फलंदाजाच्या डोक्यावर बाऊन्सर चेंडू मारण्यात, यॉर्कर चेंडूंचा वापर करून बळी घेण्यात आणि फलंदाजांच्या डोळ्यांतील भीती बघण्यात आपल्याला आनंद मिळतो. आंद्रे रसेलला बाऊन्सर गोलंदाजी केली तर श्रेयस अय्यरला यॉर्कर टाकून बाद केले. या खेळाडूंना बाद करताना मला खूप मजा आली. मॅथ्यू वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवतानाही मला फार आनंद झाला होता. माझ्या वेगवान गोलंदाजीमुळे जेव्हा फलंदाजांच्या डोळ्यांत मला भीती उतरलेली दिसते, तो आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT