Latest

Nobel Prize in Chemistry | बर्टोझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

दीपक दि. भांदिगरे

स्टॉकहोम : येथील रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये नोबेल परितोषिकांची घोषणा सुरु आहे. आज बुधवारी (दि.५) रसायनशास्त्रातील नोबेल परितोषिकाची (Nobel Prize in Chemistry घोषणा करण्यात आली. रसायनशास्त्रातील नोबेल कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल, के. बॅरी शार्पलेस यांनी जाहीर झाले आहे. क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी तिघांना नोबेल जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे बॅरी शार्पलेस हे दोन नोबेल पारितोषिक मिळविणारे पाचवे व्यक्ती ठरले आहेत. बॅरी शार्पलेस यांना २००१ आणि २०२२ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

कॅरोलिन बर्टोझी यांनी क्लिक केमिस्ट्रीला एका नवीन परिमाण दिले आहे. सजीवांमध्ये त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या बायोऑर्थोगोनल रासायानिक प्रक्रिया पेशीतील सामान्य रासायनिक प्रक्रियेत व्यत्यय आणत नाहीत. तर बॅरी शार्पलेस आणि मॉर्टन मेल्डल यांनी क्लिक केमिस्ट्रीच्या कार्यात्मक स्वरूपाचा पाया घातला असल्याचे Royal Swedish Academy of Sciences ने रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा करताना म्हटले आहे.

'क्वॉन्टम इन्फॉर्मेशन सायन्स' संशोधन; तिघांना भौतिकशास्त्राचे 'नोबेल'

'क्वॉन्टम इन्फॉर्मेशन सायन्स', 'फोटॉन्स'विषयक संशोधनाबद्दल अ‍ॅलन अ‍ॅस्पेक्ट, जॉन क्लॉझर, अँटन झेलिंगर यांना काल मंगळवारी (दि.४) भौतिकशास्त्राचे 'नोबेल' जाहीर करण्यात आले होते. अ‍ॅलन अ‍ॅस्पेक्ट हे फ्रान्समधील पॅरिस आणि स्केले विद्यापीठात प्राध्यापक आहेत. जॉन क्लॉझर हे अमेरिकेत संशोधक प्राध्यापक असून, अँटन झेलिंगर हे ऑस्टि येथील व्हिएन्ना विद्यापीठात भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत. 'एन्टँगल्ड क्वॉन्टम स्टेटस्'वर या तिघांनी अध्ययन केले.

दोन एकमेकांत अडकलेले कण एकसारखेच वर्तन करतात. ते परस्परांहून विलग केले तरी त्यांच्या वर्तनात बदल होत नाही, असे यातून त्यांनी सिद्ध केले. या संशोधनाने भौतिकशास्त्राची शाखा असलेल्या 'क्वॉन्टम इन्फॉर्मेशन थिअरी'ची व्याप्तीही वाढेल. अनेक गंभीर आजारांतही उपचाराचे नवे मार्ग या संशोधनातून सापडू शकतील. 'क्वॉन्टम कॉम्प्युटर्स', 'क्वॉन्टम नेटवर्क्स' आणि 'क्वॉन्टम एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन' या नवतंत्रज्ञान क्षेत्रांनाही या संशोधनाचा फायदा होईल. 'क्वॉन्टम मेकॅनिक्स'लाही लाभ होईल. येत्या डिसेंबरमध्ये पुरस्कार वितरण होईल. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ मधील नोबेल विजेते स्टॉकहोमला पोहोचू शकले नव्हते. या दोन्ही वर्षांतील विजेत्यांनाही आमंत्रित केले आहे.

स्वीडनच्या स्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

सोमवारी (दि. ३) स्वीडनच्या स्वंते पाबो यांना (Nobel Prize 2022) वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Physiology or Medicine Nobel Prize) जाहीर करण्यात आले होते. स्वंते पाबो यांना विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत, ज्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथे मेंजेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत. पाबो एक आनुवंशिकशास्त्रज्ञ आहे, जे उत्क्रांतीविषयक अनुवांशिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर बरेच काम केले.

दरम्यान, गुरुवारी (दि.६) साहित्यातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. नोबेल शांतता पुरस्काराबाबत बोलायचे झाले तर त्याची घोषणा शुक्रवारी (दि.७) होणार असून अर्थशास्त्रातील नोबेल १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी २०२१ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना देणा-या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT