Latest

कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही : दीपक केसरकर

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात लवकर महाराष्ट्रात परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. त्यांच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील संबंध बिघडत आहेत. पंतप्रधानांबद्दल जगभरात आदराचे स्थान आहे. जगभर पंतप्रधानांचे कौतुक होत आहे. परंतु शिवसेनेकडून त्यांच्यावर विखारी टीका होत आहे. हे बरोबर नाही. आम्ही भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला पाठिंबा म्हणून गुवाहाटीतील आमदार फोन स्वीकारत नाहीत. पण मुंबईतून येणारे फोन आदरापोटी घेत आहेत, असेही ते म्हणाले.

शिवसैनिक रस्त्यावर उतरला, तर तो कोर्टाचा अवमान ठरेल. आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आमच्या भावनांचा अंत पाहू नका. यापुढे जशाच तसे उत्तर देऊ. त्यांच्याकडे जर संख्याबळ असेल तर, महाविकास आघाडीने बहुमत चाचणी घ्यावी. राज्यपाल्यांना टोमणे का मारता ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

आम्हाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर विश्वास होता. आजही आम्ही त्यांचा आदर करत आहे. परंतु राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांचा मान राखला नाही. कमी महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्यात आली. शिवसेनेच्या मतदारसंघात शिवसेनेला पराभूत करण्यासाठी ताकद दिली जात आहे. राष्ट्रवादीचा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही केसरकर यांनी केला. सत्तेसाठी राष्ट्रवादीने शिवसेनेला दावणीला बांधले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि संभाजीराजेंचे बलिदान विसरता कामा नये. परंतु, औरंगाबादच्या नामांतरला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आली, पण ते शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण करत आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळ देत आहेत, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, त्यांच्या चर्चेकडे सकारात्मकतेने पाहतो. शिवसेनेच्या घटनेपेक्षा कायदा मोठा आहे. शिवसेनेने महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. राजकारणात अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच, यापुढे आम्ही शिवसेनेला जशाचतसे उत्तर देऊ, आम्ही दबावाला आता बळी पडणार नाही. हॉटेलमधील सर्व खर्च आम्ही स्वत: करत आहे, असे सांगून भाजपकडून रसद मिळत असल्याच्या वृत्ताचे केसरकर यांनी खंडन केले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT