Latest

न्यायव्यवस्थेवर सरकारचा दबाव नाही : सरन्यायाधीश

मोहन कारंडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मी 23 वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम करत आहे. परंतु एखाद्या प्रकरणात कोणता आणि कसा निर्णय घ्यायचा हे मला कोणी सांगितले नाही. सरकारकडून कधी कोणताही दबाव आला नाही, असे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

राजधानीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारताची न्यायव्यवस्था चांगली आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर तिला बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल. न्यायव्यवस्थेवरील दबावाबाबत बोलताना चंद्रचूड यांनी आपल्या 23 वर्षांच्या न्यायमूर्ती पदाच्या कारकिर्दीत कधीही कोणीही अमुक एका प्रकरणाचा असा निकाल लावा, असे सांगितले नाही. सरकारकडून कोणताही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायमूर्तींची नियुक्ती करणार्‍या कॉलेजियम प्रणालीचे समर्थन करताना न्या. चंद्रचूड म्हणाले की, कोणतीही व्यवस्था पूर्ण नसते. परंतु आपल्याकडे सर्वात उत्तम प्रणाली आहे. मौल्यवान असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा तिचा उद्देश आहे. कॉलेजियम प्रणालीमागील मुख्य उद्दिष्ट हे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि सुरक्षित ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले. याच विषयावरील रिजीजू यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, भिन्न द़ृष्टिकोन असण्यात गैर काहीच नाही. विधिमंत्र्यांशी वाद घालायचा नाही, आमच्या द़ृष्टिकोनांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे.

SCROLL FOR NEXT