Latest

पुणे : पालिका शाळांमध्ये संगणक निरक्षरता; पाच वर्षांपासून संगणक शिक्षकच नाहीत

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'आयटी सिटी' असलेल्या पुणे महापालिकेच्या शाळांमधील गोरगरीब विद्यार्थी गेल्या पाच वर्षांपासून संगणक शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संगणक शिक्षकाच्या 30 पदांच्या भरतीस मंजुरी मिळूनही गेल्या दीड-दोन वर्षांपासून या जागांची भरती झालेली नाही.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शहरात मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या एकूण 265 शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास लाखभर विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रामुख्याने हे विद्यार्थी गरीब घरातील व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील आहेत. मात्र, हेच विद्यार्थी गेल्या पाच वर्षांपासून संगणक शिक्षणपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. जवळपास शंभरहून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी स्वतंत्र संगणक लॅब आहेत. मात्र, हे शिकविण्यासाठी संगणक शिक्षक नाहीत. विशेष म्हणजे, शिक्षक मंडळांचा आकृतिबंध जुलै 2021 ला राज्य शासनाने मंजूर केला. त्यात संगणक शिक्षकाच्या 30 जागांच्या पदभरतीस मंजुरी दिली आहे. मात्र, त्यानंतर सलग दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अद्याप महापालिकेकडून या पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

एकीकडे पुणे शहर 'आयटी सिटी' म्हणून ओळखले जाते. सध्याचे युगही संगणकाचे आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणावर जोर दिला जातो. असे असताना पालिकेच्या शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना असे संगणक शिक्षणापासून वंचित ठेवण्याची अनास्था प्रशासनाकडून दाखविली जात असल्याने आचर्श्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

कोट्यवधींचे संगणक साहित्य धूळ खात

शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना कोट्यवधी रुपयांची संगणक साहित्य खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय नगरसेवकांच्या 'स' यादीच्या निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, आता संगणक लॅबच बंद असल्याने हे साहित्यही धूळ खात पडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT