नाशिक महानगरपालिकेने मुख्यालय राजीव गांधी भवन, विभागीय कार्यालयांसह १२ इमारतींवर पीपीपी तत्वावर उभारलेल्या सोलर प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षात वीजखर्चात सुमारे साडेतीन कोटींची बचत झाली आहे. या सौर प्रकल्पातून तब्बल २१.९५ लाख युनिट वीजेची निर्मिती करण्यात महापालिकेला यश आले आहे.
महापालिका ही निमशासकीय संस्था असली तरी महापालिकेच्या इमारती तसेच प्रकल्पांसाठी महावितरणकडून वीज आकारणी मात्र व्यावसायिक दराने केली जाते. सद्यस्थितीत वापरानुसार १४ ते २२ रुपये प्रति युनिट दराने महापालिका वीज देयक अदा करते. वाढता वीजखर्च महापालिकेच्या महसुली खर्चात वाढ करणारा ठरत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी सप्टेंबर २०१८मध्ये महापालिकेने पीपीपी तत्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. कुठलीही भांडवली गुंतवणूक न करता 'वारी' कंपनीला सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पासाठी महापालिकेने 'वारी'समवेत २५ वर्षांचा करार केला आहे. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह नाशिकरोड, सिडको, पंचवटी या विभागीय कार्यालयांच्या इमारती, पंचवटीतील स्मार्ट सिटीचे कार्यालय, मेनरोडवरील जिजामाता रुग्णालय, कालिदास कलामंदिर, फाळके स्मारक, रायगड बंगला, मायको दवाखाना, शिंगाडा तलाव येथील मनपाचे अग्निशमन मुख्यालय, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर एकूण ५९८ केडब्ल्यूपी क्षमतेचे सौरऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहेत. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे महापालिकेच्या या इमारतींना अखंडीत वीजप्राप्त झाली आहे. या प्रकल्पातून आतापर्यंत २१ लाख ९५ हजार ४६९ युनिट वीजेची निर्मिती झाली आहे. इतक्या युनिट वीजेची महावितरणकडून खरेदी करावयाची झाल्यास त्यासाठी महापालिकेला सुमारे साडेचार कोटी रुपये मोजावे लागले असते. मात्र संबंधित मक्तेदार कंपनीकडून महापालिका ४.५९ रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करत असल्याने मक्तेदार कंपनीला वीज देयकापोटी १ कोटी ९५ हजार रुपयांचा खर्च अदा करावा लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात गेल्या पाच वर्षात सुमारे साडेतीन कोटी रुपयांची बचत झाली आहे.
आकडेवारी अशी…
* सौर प्रकल्पामुळे झालेली वीजनिर्मिती – २१ लाख ९५ हजार ४६९ युनिट
* महावितरणकडील वीजेचा संभाव्य खर्च – सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये
* मनपाने वीज देयकापोटी मक्तेदाराला अदा केलेली रक्कम – १ कोटी ९५ हजार ५६३ रुपये
* सौर प्रकल्पामुळे वीज खर्चात झालेली एकूण बचत – ३ कोटी ५० लाख रुपये
असा आहे सोलर प्रकल्प (क्षमता)
राजीव गांधी भवन – २०७.२ केडब्ल्यूपी
स्मार्ट सिटी कार्यालय, पंचवटी – २५.१६ केडब्ल्यूपी
विभागीय कार्यालय, नाशिकरोड – ५२.८ केडब्ल्यूपी
विभागीय कार्यालय, सिडको – १५.५४ केडब्ल्यूपी
जिजामाता प्रसुतीगृह, मेनरोड – १३.२ केडब्ल्यूपी
विभागीय कार्यालय, पंचवटी – ३१.४५ केडब्ल्यूपी
महाकवी कालिदास कलादालन – ५५.५ केडब्ल्यूपी
फाळके स्मारक – ६६.३३ केडब्ल्यूपी
रायगड बंगला – ७.२६ केडब्ल्यूपी
मायको दवाखाना – १०.२५ केडब्ल्यूपी
मुख्य अग्निशमन कार्यालय – १३.२ केडब्ल्यूपी
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय – १००.६४ केडब्ल्यूपी
एकूण – ५९८.५३ केडब्ल्यूपी
महापालिकेने कोणतीही गुंतवणूक न करता पीपीपी तत्वावर उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प आदर्शवत ठरला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २१ लाख ९५ हजार ४६९ युनिट वीजेची निर्मिती झाली. या माध्यमातून महापालिकेच्या वीज खर्चात सुमारे साडेतीन कोटींची बचत झाली आहे. – अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, विद्युत, मनपा.