Latest

दिवसातून वीस वेळा दारूने हात धुणारा हुकूमशहा!

Arun Patil

लंडन : जगाच्या पाठीवर काळाच्या ओघात अनेक हुकूमशहा होऊन गेले. प्रत्येकाचा सनकी स्वभाव आणि विचित्र सवयी यांचे किस्से आजही चर्चेत असतात. 60 च्या दशकात रोमानियामध्ये असाच एक शासक होता, ज्याच्या काळात लोक दहशतीत राहत होते. निकोलस चाचेस्कू नावाच्या या हुकूमशहाला अशा अनेक विचित्र सवयी होत्या, ज्यांचा उल्लेख आजही केला जातो. यापैकी एक सवय म्हणजे दिवसातून 20 वेळा दारूने हात धुणे!

हुकूमशहा निकोलस चाचेस्कू लोकांना स्पर्श केल्यानंतर त्याचा हात स्वच्छ धुवायचा. जेव्हाही तो कोणाशी हात मिळवायचा अथवा शेकहँड करायचा, त्यावेळी नंतर लगेच तो आपला हात अल्कोहोलने धुवायचा. जर त्याने दिवसाला 30 लोकांशी हात मिळवला, तर तितक्या वेळा तो बाथरूममध्ये जाऊन अल्कोहोलने हात धूत असे. याच कारणामुळे त्याच्या स्युटमधील प्रत्येक बाथरूममध्ये दारू ठेवली जायची. निकोलस चाचेस्कू याला स्वच्छतेचा एक प्रकारे आजारच होता. आजच्या काळात ज्या पद्धतीने लोक हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतात, त्याचप्रमाणे त्या काळात निकोलस चाचेस्कू हात स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करायचा.

निकोलस चाचेस्कू हा एक क्रूर शासक होता, तो लोकांना त्याच्या मनात येईल तसे आदेश देत असे. चाचेस्कूने एकदा लोकांना त्यांच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवण्याचे आदेश दिले. तो सतत लोकांची हेरगिरी करून त्यांच्यावर लक्ष ठेवत असे. हुकूमशहाचे गुप्तचर एजंट लोकांवर लक्ष ठेवत नेहमी रस्त्यावर बसलेले असायचे. चाचेस्कूने 25 वर्षे देशातील माध्यमं पूर्णपणे निर्बंधांखाली ठेवली. एवढंच नाही, तर त्यानं देशामध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू, तेल आणि पाण्याबरोबरच औषधांवरही निर्बंध लादले. बाजारात फळं, भाज्या मिळणं बंद झालं. या सर्वाचा परिणाम म्हणजे हजारो लोक विविध आजार आणि उपासमारीला बळी पडले. चाचेस्कू याला रोमानियामधील लोक 'कंडूकेडर' म्हणून ओळखत होते, ज्याचा अर्थ 'नेता' असा होतो. तर त्याच्या पत्नी एलिनाला 'राष्ट्रमाते'चा किताब देण्यात आला होता.

निकोलस चाचेस्कू याची उंची कमी होती. तो केवळ 5 फूट 4 इंच उंचीचा होता. मात्र, त्यांनी सर्व फोटोग्राफरला सूचना दिल्या होत्या की, तो फोटोत उंच दिसला पाहिजे असेच फोटो काढावेत. तो 70 वर्षांचा असतानाही त्याचे वयाच्या 40 व्या वर्षांत काढलेले फोटो प्रकाशित होत होते. चाचेस्कूची दहशत इतकी वाढली होती की, रोमानियातील लोकांना व्यवस्थित खायलाही मिळत नव्हतं. फळं, भाज्या आणि मांस दुसर्‍या देशांत निर्यात केलं जात होतं. या सगळ्याला कंटाळून लोकांनी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आणि ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेवटी 25 डिसेंबर 1989 मध्ये चाचेस्कू आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. कोर्टाने त्या दोघांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि सैनिकांनी गोळी झाडून चाचेस्कूच्या हुकूमशाहीचा अंत केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT