Latest

उमेश कोल्हे हत्याकांड : फरार आरोपीवर 2 लाखांचे बक्षिस, एनआयएची घोषणा

रणजित गायकवाड

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पशू वैद्यकीय औषध विक्रेता उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) फरार आरोपी शहीम अहमद उर्फ फिरोज अहमद (र. जाकिर कॉलनी) याच्या अटकेच्या सूचनेकरिता 2 लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे. शहीम अहमद हा हत्येनंतर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक केली आहे.

आता पर्यंत 10 जण अटकेत

वादग्रस्त टिप्पणी करणा-या भाजपाच्या निलंबित राष्ट्रीय प्रवत्ता नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट समाज माध्यमांवर पोस्ट करणारे पशू वैद्यकीय औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणात एनआयएने आता पर्यंत 10 जणांना अटक केली आहे. तर आरोपी शहीम अहमद (22) हा चार महिन्यांपासून फरार आहे. आरोपी शहीम अहमद याच्या अटकेकरिता कोणत्याही प्रकारची माहिती देणा-या व्यक्तीस 2 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा एनआयएने केली आहे.

17 जणांची चौकशी

कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयए बारकाईने तपास करीत आहे. मागील काही दिवसांपासून एनआयएचे पथक शहरात डेरा टाकून आहे. अटकेतील आरोपींच्या मोबाइलचा डाटा तपासत प्राप्त झालेल्या माहितीवरून संबंधितांसोबत माहिती घेतली जात आहे. यात चौकशी व बयाण नोंदविण्यात आले आहे. ज्यांनी धमकी दिली, अशा 17 जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT