पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा 23 वर्षीय अष्टपैलू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) हा ऑक्टोबर महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी याची घोषणा केली. या शर्यतीत रचिनने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यांना मागे टाकले.
ऑक्टोबर महिन्यात रचिनसह जसप्रीत बुमराह आणि क्विंटन डी कॉक यांनाही आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले होते, परंतु रचिनने या दोघांनाही मागे टाकत पुरस्कारावर मोहोर उमटवली. पुरस्कार जिंकल्यानंतर रचिन म्हणाला की, 'आयसीसीने माझ्या प्रदर्शनाची दखल घेतली आहे, ज्याचा मी आभारी आहे. पुरस्कार जिंकल्याचा आनंद आहे. गेल्या महिन्यापासून आम्ही भारतात विश्वचषक खेळत आहे, जो माझ्यासाठी आणि संघासाठी खूप खास अविश्वसनीय राहिल आहे. संघाचा पाठिंबा मिळाल्याने तुमच्या खेळाला खूप मदत होते आणि तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळता येतो. भारतीय विकेट माझ्या फलंदाजीसाठी योग्य आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की मी चांगला खेळ करू शकलो.'
वृत्त लिहिपर्यंत रचिन (Rachin Ravindra) या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने आपल्या संघासाठी 9 सामन्यांमध्ये 565 धावा केल्या आहेत. तो पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला असून त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
रचिन रविंद्रने (Rachin Ravindra) गेल्या महिन्यात भारतात खेळल्या जात असलेल्या विश्वचषकात सहा सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 81.20 च्या सरासरीने 406 धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने दोन शतकेही झळकावली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध 123 धावांची नाबाद खेळी केली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 116 धावा तडकावल्या. याशिवाय गोलंदाजीतही तीन बळीही मिळवले आहेत.
भारतीय वंशाचा या खेळाडूने सध्या भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. रचिन फलंदाजीत भरघोस धावा वसूल करत आहे. तर दुसरीकदे गोलंदाजीतही संघासाठी विकेट घेत आहे. विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. लहान वयात रचिन ज्या प्रकारे खेळत आहे, त्यामुळे त्याला न्यूझीलंड संघाचे भविष्य मानले जात आहे.