Latest

संरक्षण : नौदलातलं नवं परिवर्तन

Arun Patil

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या तारकर्ली किनार्‍यावर नुकताच पार पडला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या शुभ्र गणवेशावर आता शिवमुद्रा उमटवली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

भारतीय नौदलाच्या वतीने साजरा करण्यात येणारा यंदाचा नौदल दिन कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक तारकर्ली समुद्रकिनार्‍यावर मोठ्या दिमाखात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते होते त्यांनी समुद्री किल्ल्यांच्या मदतीने समुद्रातही स्वराज्य निर्माण केले होते. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपतींनी अनेक किल्ले बांधले. त्यासाठी अनेक ठिकाणी तटबंदी, मनोरे, खंदक तयार केले, ज्यावर हल्ला करणे शत्रूंना कठीण होते. गनिमी काव्यासाठीदेखील हे किल्ले वापरले जात. महाराजांचे नौदल हे जवळपास 25 ते 30 हजार एवढ्या संख्येचे होते. त्यांच्याकडे 100 हून अधिक गलबते आणि इतर लढाऊ जहाजे होती. यंदा शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होताहेत. त्याचे औचित्य साधून नौदल दिनाचे आयोजन महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या 43 फूट उंच पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.

चार डिसेंबर 1971 या दिवशी भारतीय नौदलाने क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने कराची बंदरावर आक्रमण करून ते नष्ट केले होते. ही पाकिस्तान विरोधातील लढाईत निर्णायक कामगिरी समजली जाते. त्याचे स्मरण म्हणून हा दिवस 'नेव्ही डे' म्हणजेच नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्वी नौदल दिन, हवाई दिन आणि लष्कर दिन हे केवळ दिल्लीमध्ये साजरे होत असत. परंतु, भारताच्या इतर भागातील जनतेलाही भारतीय सैन्याचे सामर्थ्य कळावे, तसेच ते देशाचे रक्षण कशाप्रकारे करू शकते, याचे आकलन व्हावे, यासाठी असे दिवस देशातील विविध भागांमध्ये साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 'सैन्य दिवस' हा उत्तर प्रदेशातील लक्ष्मणपुरी येथे साजरा झाला होता, तर 'हवाई दल' दिवस जोधपूरला साजरा झाला होता. त्याचप्रमाणे 'नौदल दिन' हा सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ साजरा झाला.

नौदलाचा आधीचा झेंडा आणि लोगो ब्रिटिशांच्या पाऊलखुणांची आठवण करून देणारा होता. काळानुरूप त्यात बदलही होत गेले. गेल्यावर्षी नौदलाच्या ध्वजावर शिवछत्रपतींची मुद्रा स्थापित करण्यात आली. आज नौदलाची शान असणारा ध्वज आणि त्यावरचा नेव्हीचा लोगो छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेणारा आहे. या नव्या लोगोत नेव्हीचं ब्रीदवाक्य आणि अँकर यांच्या भोवती असलेल्या अष्टकोनाची प्रेरणा शिवरायांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली आहे. नौदलाच्या झेंड्यावरचा निळा अष्टकोनी आकार आठ दिशांचं प्रतिनिधित्व करतो. आठही दिशांना भारतीय नौदलाचा दबदबा कायम राहो, ही भावना या अष्टकोनी आकारातून प्रतित होते. आता शिवाजी महाराजांची शिवमुद्रा नौदलाच्या शुभ्र गणवेशावर उमटवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नौसैनिकांच्या खांद्यावरील चिन्हांत शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब झळकणार आहे.

भारतीय नौसेनेला एक इतिहास आणि समर्थ वर्तमान तर आहेच; पण भविष्याकडे पाहण्याची द़ृष्टीही आहे. भारतीय नौदल हे जगातील 5 व्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. भारतीय नौदलाने पारंपरिक आणि अणू इंधनावर चालणार्‍या पाणबुड्या आणि सरकारी गोद्या बांधण्याची प्रक्रिया चालू केली. त्यासाठी खासगी आस्थापनांसमवेत करार करून वेगाने नौकाबांधणीची प्रक्रिया चालू केली. यातील काही प्रकल्प यशस्वी ठरले, तर काही लालफितीत बारगळले. सध्या देशभरातील विविध गोदींमध्ये 34 युद्धनौका आणि पाणबुड्या यांची बांधणी चालू आहे. स्वदेशी बनावटीच्या विविध श्रेेण्यांच्या काही युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात भरती झाल्या आहेत.

भारताकडे 15 पारंपरिक पाणबुड्या, 2 अणू इंधनावर चालणार्‍या आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागणार्‍या पाणबुड्या आहेत. पाणबुड्यांच्या संदर्भात भारतीय नौदल हे पाकिस्तानहून पुष्कळ बलशाली आहे. असे असले, तरी चीन भारतीय नौदलाहून आघाडीवर आहे. चीनकडे 78 पाणबुड्या आहेत. त्यापैकी 6 अत्याधुनिक बॅलेस्टिक आण्विक पाणबुड्या असून, त्यांचा पल्ला 7 सहस्र 200 किलोमीटरचा आहे. अणू इंधनावर चालणार्‍या 14 आणि 57 पारंपरिक पाणबुड्या आहेत. लवकरच 200 युद्धनौकांच्या सुसज्ज आणि स्वयंपूर्ण ताफ्यासह भारतीय नौदल सिद्ध होईल. गेल्या काही वर्षांपासून नौदलात महिला अधिकारी आणि सैनिक कार्यरत आहेत.

अलीकडेच भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. रिअर अ‍ॅडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते अलीकडेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रेरणा या मूळच्या मुंबईतील असून, त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या 2009 मध्ये भारतीय नौदलात रुजू झाल्या. आजवर युद्धनौकेचे नेतृत्व करण्याची संधी महिला अधिकार्‍याला देण्यात आली नव्हती. मात्र, आता ती देण्यात येत आहे, ही बाब परिवर्तनकारी म्हणायला हवी. प्रेरणा देवस्थळी यांची वॉटरजेट एफएससी युद्धनौका 'आयएनएस त्रिंकट'वर कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्या फर्स्ट लेफ्टनंट म्हणून 'आयएनएस चेन्नई'वर कार्यरत होत्या.

लेफ्टनंट सीडीआर प्रेरणा या टीयू 142 वरील पहिल्या महिला निरीक्षक आहेत. त्यांच्या निवडीमुळे सैन्यदलातील महिला अधिकार्‍यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याखेरीज नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अग्निवीरांच्या एकूण संख्यने यंदा एक हजाराचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी सेवेत महिलांना सर्वप्रकारच्या जबाबदार्‍या व श्रेणी देण्याच्या नौदलाच्या द़ृष्टिकोनाचा पुरावा आहे. तसेच भारतीय संरक्षण क्षेत्राच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.

पुरुषांपेक्षा महिला कमजोर असतात, असा एक गैरसमज आपल्याकडच्या व्यवस्थेत रूढ झालेला आहे; पण महिला या बौद्धिक व मानसिकद़ृष्ट्याही युद्धासाठी सक्षम आहेत. किंबहुना, शिस्तपालन व सहकार्‍यांशी सौहार्दाने वागणे, परिपक्वता याबाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचे दिसून आले आहे. आज अमेरिका, इस्रायल, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान वायुसेनेत महिला लढाऊ विमाने चालवीत आहेत. प्रवासी विमाने चालविणार्‍या महिलांची तर गणतीच नाही. अगदी जम्बो जेटपासून तर एअरबसही महिला चालक चालवीत आहेत. भारतीय महिलांमध्येही ती क्षमता आहे. ही क्षमता सिद्ध करण्याची संधी देण्याबाबत नौदलासह तिन्ही दलांनी घेतलेला पुढाकार हा स्वागतार्हच आहे.

बदलत्या जागतिक समीकरणांमुळे भारतीय नौदलासमोरील आव्हाने पालटली आहेत. पाणबुड्या, विमानवाहू आणि अन्य युद्धनौका यांच्या बांधणीत चीनच्या वेगाशी स्पर्धा करणे अन्य कोणत्याही देशाला शक्य झालेले नाही. सध्या चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन आण्विक कार्यक्रम जोमाने रेटत आहेत. चीनकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भारताने सागरी युद्धातील त्याचे बळ वाढवणे अत्यावश्यक आहे. येणार्‍या काळात नौदलाची उंची आणि करिष्मा असाच उत्तरोत्तर वधारत राहील, यात शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT