Latest

कृष्णा-गोदावरी खोर्‍यात नवे तेलसाठे

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील काकिनाडा किनारपट्टीपासून 30 कि.मी. अंतरावरील कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील खोल समुद्रात तेलाचे साठे आढळून आले आहेत. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भातील पोस्ट प्रसारित केली आहे.

7 जानेवारी रोजी बंगालच्या उपसागरात हे साठे सापडल्याचे पुरी यांनी सांगितले. इंधन आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वतीने (ओएनजीसी) त्यामधून उपसा करण्याचे काम सुरू करण्यात आले. 2016 सालापासून कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील तेलसाठ्याची शोधमोहीम सुरू होती. परंतु, कोरोना साथीमुळे हे शोधकार्य थांबले होते. नव्या वर्षाच्या प्रारंभीच 7 जानेवारीला या ठिकाणी तेलसाठे आढळून आले आहेत.

देशात सध्या 26 तेलसाठे आहेत. त्यापैकी 4 तेलसाठे कार्यान्वित आहेत. जून-जुलैपासून यामधून दिवसाला 45 हजार बॅरल तेल काढले जाईल. एकूण तेल उत्पादनात याचे प्रमाण 7 टक्के असणार आहे. नैसर्गिक वायू उत्पादनाच्या तुलनेतही हे प्रमाण 7 टक्के राहणार आहे. कृष्णा-गोदावरी खोर्‍यातून तेल उत्पादनाचे दुसर्‍या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. तिसर्‍या टप्प्यातील काम जून 2024 पासून सुरू होणार असल्याची माहिती 'ओएनजीसी'च्या सूत्रांनी दिली.

इंधनासह गॅसचे उत्पादन वाढणार

तिसर्‍या टप्प्यातील उत्पादनास जूनपासून प्रारंभ होणार आहे. काकिनाडा येथील 98/2 ब्लॉकमधील प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर एकूण इंधन उत्पादनाच्या 11 टक्के, तर एकूण गॅस उत्पादनाच्या 15 टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन होणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली. भारत हा जगातील तिसर्‍या क्रमाकांचा तेल आयातदार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT