Latest

कोल्हापूर : ‘न्यू मेल्टिंग सेंटर कंपनीला’ ६ कोटी ९७ लाखांचा गंडा; वजनात फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मोनिका क्षीरसागर

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा: कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील 'न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि.' कंपनीला माल पुरवठा करताना वजनात फेरफार करत, ६ कोटी ९७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कागल एमआयडीसीमधील श्री स्वामी समर्थ वे ब्रिजवर छापा टाकला असता, वजन काट्यात फेरफार केल्याचे आढळून आले. याची दखल घेत संबंधित फसवणूक करणाऱ्या श्री स्वामी समर्थ वे ब्रिज या कंपनीवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती, न्यू मेल्टिंग कंपनीचे मालक अबुबकर शेख यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, अबूबकर दिलावर शेख (रा. वाय. पी. पोवारनगर, कोल्हापूर) यांच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अब्दुल कच्छी, अमीर कच्छी (दोघेही रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर), आनंदा शिंदे (रा. कुशिरे ता. पन्हाळा), परशुराम गायकवाड व गणेश गायकवाड (दोघे रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले), पांडुरंग कुंभार (रा. राधानगरी) हे सहाजण न्यू मेल्टिंग सेंटर (प्लॉट नंबर एफ ११) या कंपनीस कच्च्या मालाचा पुरवठा करीत होते. त्यांनी २०२१, २०२२ या दोन आर्थिक वर्षांत श्री साई समर्थ वे ब्रिजचे मालक तुषार अशोक सूर्यवंशी (रा. गोकुळ शिरगाव) व फाईव्ह स्टार महात वे ब्रिजचे मालक वसिम आक्रम महात यांच्याशी संगनमत केले. यानंतर त्यांनी वजनकाट्यामध्ये बदल करून, वेळोवेळी सी आय (कास्ट आयर्न) बोरिंग मालपुरवठामध्ये अपहार केला होता.

लेखापरीक्षणादरम्यान अहवालात ६ कोटी ९७ लाख रुपयांच्या एकूण १७०० टन मालाचा कमी पुरवठा झाल्याचे कंपनीच्या निदर्शनात आले. वरील सहा पुरवठादार व दोन वजनकाट्यांचे मालक अशा आठ जणांविरुद्ध १३ जुलै रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावेळी वजनकाट्यांवर चौकशी केली असता, वजन काट्यात कोणताही फेरफार करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रविवारी (दि. 21) पोलिसांनी अचानक श्री स्वामी समर्थ वे ब्रिज या वजन काट्यावर रेड टाकली. यानंतर येथील संगणक कर्मचाऱ्यांने वजन काटा मॅनेज करता येत असल्याचे स्पष्टपणे कबूल केले. व्हिडिओमध्ये पण हे स्पष्टपणे दिसून आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT