पुढारी ऑनलाईन : ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता डीआरडीओ (DRDO) द्वारे न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राइमची (New Generation Ballistic Missile Agni Prime) यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.
अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राने त्याचे निश्चित लक्ष्य गाठण्यात यश मिळवले. हे क्षेपणास्त्र अग्नी सीरीजमधील आधुनिक, मारक, अचूक आणि मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. ११ हजार किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात २ हजार किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य सहज भेदण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. हे उच्च-तीव्रतेचे स्फोटक थर्मोबॅरिक अथवा आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
अग्नी प्राइम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर यूजर्सद्वारे आयोजित केलेले हे पहिले प्री-इंडक्शन नाईट प्रक्षेपण होते, ज्यामुळे सिस्टमची अचूकता आणि विश्वासार्हता प्रमाणित होते. रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम सारखी अनेक श्रेणी उपकरणे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. यात वाहनाच्या संपूर्ण प्रक्षेपणाचा फ्लाइट डेटा घेण्यासाठी टर्मिनल पॉईंटवर दोन डाउनरेंज जहाजांचा समावेश होता.
DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यशस्वी घेण्यात आली. यामुळे या प्रणालीला सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यू जनरेशन बॅलिस्टिक मिसाईल अग्नी प्राइमच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे.
संरक्षण विभागाचे R&D चे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी DRDO प्रयोगशाळांच्या पथकांनी आणि चाचणी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या यूजर्संनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. (Agni Prime Missile)