पुढारी ऑनलाईन: 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (पीफ) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता हा महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे.
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने 21 वा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात जी-20 मुळे गर्दी आणि अनेक दिग्गज मंडळी येणार असल्याने महापालिकेकडून आणि राज्य शासनाकडून हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीमध्ये होणारा महोत्सव फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. त्यातील 140 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवात दाखवण्यात येणारे सर्व चित्रपट हे A+ ग्रेडचे आहेत.
कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहायल, सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन अशा तीन ठिकाणी एकूण नऊ पडद्यांवर चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवात एक भारतीय आणि दोन इतर देशांतील लोक ज्युरीमध्ये असतील.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 जानेवारी तर स्पॉट नोंदणी 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये 800 आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी 600 रुपये असणार आहे.