Latest

नगर : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी पुस्तके, नवा गणवेश !

अमृता चौगुले
नगर : पुढारी वृत्तसेवा :  नव्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नवा गणवेश व नवी पुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी जिल्ह्याला 18 लाख 54 हजार 332 पुस्तके शासनाकडून प्राप्त झाली असून, प्रत्येक शाळेवर ही पुस्तके पोहोच करण्यात आली आहेत. तसेच पाच कोटींच्या निधीतून दीड लाख मुलांना शाळास्तरावर गणवेश खरेदीसाठीही शाळा व्यवस्थापनाची लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे.
शासनाच्या वतीने दर वर्षी पहिले ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. या वर्षीही नगरसाठी 18 लाख पुस्तके प्राप्त झाली होती. ती पुस्तके संबंधित शाळांवर पोहच करण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात ही पुस्तके देण्यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठीही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला पाटील यांनी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना एक गणवेश देण्याबाबतही हालचालींनी वेग घेतल्याचे दिसून येते.
प्रत्येक विद्यार्थ्याला चार पुस्तके
पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक घटक चाचणीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात दिसणार आहे. त्यात पहिल्या सहामाहीतील दोन व दुसर्‍या सहामाहीतील दोन घटक चाचण्यांचा समावेश असेल. त्यानुसार चार पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाणार आहेत. आठवीसाठी मात्र हिंदी, संस्कृत विषय असतील. त्यासाठी आणखी एक पुस्तक वाढणार आहे.
सर्वांना गणवेश नाहीच; सामाजिक दरी कायम!
एका गणवेशासाठी शासन 300 रुपये देते. या वेळी दोन-दोन गणवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दारिद्य्ररेेषेखालीलच नव्हे तर इतरही सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे संकेत शासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात पूर्वीप्रमाणेच लाभार्थी निवडताना इतर विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास शासनाने असमर्थता दर्शविली आहे. शिवाय ज्यांना दोन गणवेश जाहीर केले, त्यांनाही एकाच गणवेशाचे पैसे वर्ग केलेे आहेत.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. या वर्षीसाठी 18 लाखांहून अधिक पुस्तके नगर जिल्ह्याला मिळाली आहेत. ती पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. गणवेशाबाबतही कळविले आहे.
– भास्कर पाटील,  शिक्षणाधिकारी 
तालुकामिळालेली पुस्तके
नगर        131877
संगमनेर 218465
नेवासा   172592
पाथर्डी 115104
पारनेर   116353
राहुरी 147358
कर्जत  105965
जामखेड   77343
कोपरगाव136304
श्रीरामपूर121116
अकोले 107071
श्रीगोंदा 137087
शेवगाव 118498
राहाता 129199
एकूण 1854332
SCROLL FOR NEXT