Latest

‘जयप्रभा’ चित्रपट महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची गरज

Arun Patil

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : जयप्रभा स्टुडिओच्या आंदोलनाला यश येऊन आता या जागेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत; पण स्टुडिओच्या जागेचा हेरिटेज वास्तूत समावेश असल्याने ही वास्तू चित्रीकरणासाठी खुली राहावी म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे ती हस्तांतरित करणे गरजेचे आहे, अन्यथा सध्या अस्तित्वाची लढाई लढणारा जयप्रभा स्टुडिओ भविष्यात पुन्हा कधी गिळंकृत होईल याचा पत्ताही लागणार नाही.

जयप्रभा स्टुडिओ हा नेहमी अनेक कारणांनी वादात राहिला आहे. 13 एकरांवर पसरलेला जयप्रभा स्टुडिओ प्रसिद्ध चित्रपट-निर्माते भालजी पेंढारकर यांनी 1926 मध्ये कोल्हापूरचे तत्कालीन शासक छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीवर उभारला होता.1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात स्टुडिओची जाळपोळ झाली, पण नंतर लगेचच तो पुन्हा उभारला गेला. लता मंगेशकर यांनी लहानपणी जयप्रभा स्टुडिओमध्ये काम केले होते.

चित्रपट व्यवसायात तोटा झाल्यामुळे पेंढारकरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मंगेशकर यांनी 1959 मध्ये त्यांच्याकडून स्टुडिओ विकत घेतला. त्यानंतर या स्टुडिओची मालकी त्यांच्याकडे राहिली. 2003 साली कोल्हापूर महानगरपालिकेने स्टुडिओला हेरिटेज मालमत्ता म्हणून घोषित केले व मंगेशकर यांना जमीन विकसित करण्यापासून प्रतिबंधित केले. मंगेशकर यांनी महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2013 मध्ये हेरिटेज दर्जा कायम ठेवला. तोपर्यंत स्टुडिओ बंद झाला होता, पण 2014 साली प्रथम स्टुडिओ विक्रीचा प्रयत्न झाला. ही बाब कोल्हापूरकरांना समजली तेव्हा तीव्र आंदोलन झाले. लता मंगेशकर यांच्या भूमिकेला कोल्हापूरकरांनी विरोध केला.

यानंतर जयप्रभा स्टुडिओमधील चित्रीकरण कायमस्वरूपी बंद झाले. अशातच दोन वर्षांपूर्वी पुन्हा स्टुडिओची विक्री झाली. श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्म संस्थेने हा स्टुडिओ खरेदी केल्याचे वृत्त समजल्यानंतर कलाप्रेमींनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. तेव्हाही शासनाने, महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन महामंडळाला चालवण्यास द्यावी, अशी मागणी होत होती.

SCROLL FOR NEXT