Latest

Samruddhi Expressway : समृद्धीवर हवे मदत केंद्र, अग्निशमन केंद्र : बाबा डवरे

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतरही या मार्गावर रोज अपघात होत असून हकनाक जीव जात आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्राथमिक सुविधाच नाहीत यामुळे त्वरित उपचारही मिळू शकत नाहीत, हे वास्तव आजच्या भीषण अपघातानंतर प्रकर्षाने दिसून आले. नागपूरपासून निघाल्यानंतर थेट २०० किलोमीटरच्या अंतरात एकही अग्निशमन केंद्र नसल्याची बाब खूपच गंभीर आहे. एखाद्या वाहनाने पेट घेतल्यास प्रवाशांना जळून खाक होण्याशिवाय पर्यायच नाही. हे भयाण वास्तव पुढे आले आहे. राज्य सरकारने समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर अग्निशमन व मदत केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे मत 'पुढारी' शी बोलताना नागपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा डवरे यांनी व्यक्त केले.

समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Expressway) ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंधरा दिवसांतच २८ डिसेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास पहिला जीवघेणा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला होता. महिनाभरात चार गंभीर अपघात झाले यात १६ जण जखमी झाले. पाच किरकोळ अपघातात २० जण जखमी झाले. अशाप्रकारे या महामार्गावर मग अपघातांची मालिकाच सुरू झाली.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी पुढे आली. महामार्ग संमोहन हे महत्वाचे कारणही पुढे आले. उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. राज्य सरकारने उपाययोजनांसाठी पावले उचलली. परिवहन, रस्ते, सुरक्षा विभाग कामाला लागले. पोलिसांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली. वाहनांचे प्रवासाला निघताना टायर तपासणीसोबत नागपूर-शिर्डीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे आठ ठिकाणी चालकांसाठी समुपदेशन केंद्र उभारणे यावर चर्चा झाली. मात्र, आज या मार्गावर मदत केंद्रे नाहीत, अग्निशमन केंद्रही नाही. आजच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठराविक अंतरावर अग्निशमन केंद्राचा मुद्दाही पुढे आला. या अंतरात एखादे वाहन जळल्यास एक ते दीड तास प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत प्रवाशांचा जीव जाण्याचीच शक्यता आहे. मदत केंद्र नसल्याने अपघात झाल्यास प्रवाशांवर वेळेत उपचार होणे अशक्य असल्याने नाहक बळी जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT