Latest

नेत्ररोगाबाबत जनजागृतीची गरज : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जगात द़ृष्टिदोषाचे प्रमाण वाढत आहे. जगातील 800 कोटी लोकसंख्येपैकी 59 कोटी 60 लाख लोकांना जवळचे, तर 51 कोटी लोकांना लांबचे दिसत नाही. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के लोकांना द़ृष्टिदोष आहे, हे मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी द़ृष्टिदोषाचे योग्य निदान आणि वेळेत उपचार झाले पाहिजेत. डोळ्यांची काळजी ही काळाची गरज आहे. मात्र, देशातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांना द़ृष्टिदोषाबाबत जागृती नाही. यामुळे सर्वच स्तरांवर जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ती डॉक्टरांसह समाजाचे नेतृत्व करणार्‍यांची, माध्यमांचीही जबाबदारी असल्याचे मत दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केले.

स्वप्निल आय अँड लेसर सेंटरच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी आयोजित 'सीएमई' परिषदेचे डॉ. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत मुंबईचे ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. संदीप नागवेकर आणि डॉ. रामानुजन ओडियार यांनी लाईव्ह 'रिफ्रॅक्टिव कॅटरॅक्ट सर्जरी'चे प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर डॉ. हळदीपूरकर, डॉ. नागवेकर, डॉ. ओडियार यांच्यासह 15 तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात आयोजित उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. जाधव म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 2.2 अब्ज लोकांना जवळचे किंवा लांबचे दिसण्याचा दोष आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ कमिशनच्या अहवालानुसार जगातील 59 कोटी 60 लाख लोक दूरच्या, तर 51 कोटी लोक जवळच्या द़ृष्टिदोषाने ग्रस्त आहेत. एकूण जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दहा टक्के लोकांना द़ृष्टिदोष आहे. सध्या संगणक युग आहे. यामुळे संगणक, मोबाईलचा वापर वाढत आहे. त्यातून डोळ्यांचे आजार वाढत आहेत.

मोतीबिंदू हे द़ृष्टिदोषाचे प्रमुख कारण बनत चालले आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, नॅशनल ब्लाईंडसनेस अँड व्हिज्युअल इम्पेअमेंटच्या पाहणीनुसार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीमागे अंधत्वाच्या 66.2 टक्के प्रकारांमध्ये मोतीबिंदू कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. मधुमेहाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मोतीबिंदू, काचबिंदूचे प्रमाणही वाढत आहे. कोरडे डोळे होण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात 2030 पर्यंत हे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत जाईल, त्याचा शहरी लोकांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

देशात 1 लाख 25 हजार नेत्रतज्ज्ञांची गरज असताना सध्या देशात अंदाजे 26 हजार नेत्रतज्ज्ञ आणि 45 हजार ऑप्टोमेट्रिस्ट आहेत, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, अमेरिकेत जेडीपीच्या 19 टक्के, तर युरोपमध्ये 7 टक्के खर्च आरोग्यावर होतो. भारतात मात्र हे प्रमाण अवघे 2.1 टक्के इतके आहे. हे प्रमाण वाढायला पाहिजे. कोरोनानंतर तर आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्य धोरणात अंधत्व हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार धोरण आखावे लागेल, असेही डॉ. जाधव म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट होत आहे. यामुळे बदलते नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याद्वारे सकारात्मक द़ृष्टिकोन निर्माण करण्यास तसेच नवी ऊर्जा मिळण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण दोशी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान, त्यानुसार नवे शिक्षण याचे महत्त्व आहे. नवे तंत्रज्ञान दररोज बदलत आहे. यामुळे 'सीएमई'सारखे कार्यक्रम लाभदायी आहेत.

यावेळी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर, डॉ. प्रीतम शहा, डॉ. उमा प्रधान, डॉ. श्रीकृष्ण ढगे, डॉ. शेखर परांजपे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोगळेकर यांच्या वतीने डॉ. मंदार जोगळेकर यांनी सन्मान स्वीकारला.

प्रारंभी डॉ. सुहास हळदीपूरकर व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी डॉ. रामानुजन ओडियार, डॉ. सचिन शहा, डॉ. संदीप नागवेकर, बेळगाव नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. सदानंद पाटणे, डॉ. अभिजित तगारे, डॉ. प्रीती मेहता, डॉ. कश्मिरा शहा, डॉ. नंदिता ओडियार, मिलिंद टोपले उपस्थित होते. 'लाईव्ह सर्जरी'चे सूत्रसंचालन डॉ. महेश दळवी यांनी, तर 'सीएमई' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय घोटणे व डॉ. पूजा सासुरकर यांनी केले.

यावेळी डॉ. संजय रसाळ, डॉ. मिलिंद किल्लेदार, डॉ. विराज प्रधान, डॉ. शरद भोमाज, डॉ. शिल्पा कोडकेणी, डॉ. अस्मिता पाटणे आदींनी विविध विषयांवर सादरीकरण आणि मार्गदर्शन केले.

SCROLL FOR NEXT