Latest

NCP Symbol : सत्तेसाठी घातलेला वळसा महाराष्ट्राला पटेल का? मनसेचा अजित पवारांना सवाल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाचे बहुमत ग्राह्य धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करणारा निकाल म्हणजे आयोगाने शिवसेना प्रकरणी गेल्यावर्षी दिलेल्या निकालाचीच नक्कल असल्याचे स्पष्ट आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला वळसा महाराष्ट्राला पटेल का? असा सवाल केला आहे.

गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्षांना खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिल्यानंतर अजित पवार यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली होती. "तुमच्यात धमक होती तर स्वतःचा पक्ष काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं?" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करणारा निकाल दिल्यानंतर हा व्हिडीओ आता मनसेकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. 'भुजां'मध्ये कितीही बळ आहे, असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? असा सवाल मनसेने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमधून केला आहे.

'दुसऱ्याच्या बळावर पक्ष हिसकावणं सोप'

निवडणूक आयोगाचा हा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. राज्यसभेची निवडणूक लक्षात घेऊन शरद पवार गटाला नवीन पक्ष, चिन्हासाठी नाव आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला बुधवारी (७ फेब्रुवारी) ४ वाजेपर्यंत द्यायचे आहेत. त्या तीनपैकी निवडणूक आयोग एक चिन्ह आणि नाव शरद पवार गटाला देईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पक्षफुटीनंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात घेतलेल्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंप्रमाणेच आपल्याही हातून पक्ष आणि चिन्ह जाऊ शकतो, असे स्पष्टपणे सांगितले होते. पक्षाचे नाव व चिन्ह हातून गेल्यास मग तुम्ही कोणते चिन्ह घेणार, असा प्रश्न काही लोक विचारत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, शरद पवार हेच आमच्या पक्षाचे चिन्ह आहे आणि असेल, अशा शब्दात त्यांनी आयोगाच्या अपेक्षित निकालाबाबत जुलै २०२३ मध्येच भाष्य केले होते. आयोगाच्या निकालानंतर मनसेने आणखी एक पोस्ट एक्सवर केली आहे. "बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ," असे कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT