Latest

NCP Maharashtra | आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत दोन्ही राष्ट्रवादींची लक्तरे वेशीवर

Arun Patil

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून आता तीन महिने होत आले आहेत. पहिल्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून नरमाईचे धोरण अवलंबले जात होते आणि काही निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटी-गाठी घेण्याचेही तंत्र अनुसरले जात होते; पण आता महिनाभरापासून दोन्ही गटांच्या नेत्यांची आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली असून, त्यात दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या पदरात त्यांच्या त्यांच्या पापाचे माप घालण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यात दोन्ही पक्षांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. (NCP Maharashtra)

पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी आपली पहिली जाहीर सभा घेतली, ती येवला येथे. येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ. भुजबळ हे एकेकाळी पवारांच्या गुड बुकमधील. फुटीनंतर भुजबळ त्यांना भेटायलाही गेले होते; पण ते परत काही आले नाहीत. पवारांनी भुजबळ यांच्यावर तोफ डागली. अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल माफी मागतो, हे त्यांचे उद्गार. त्यांचा राग त्यातून व्यक्त झाला.

पवारांनी राजीनामा का दिला नाही?

भुजबळ यांनी एकेकाळच्या आपल्या गुरुतुल्य नेत्यावर बीडच्या सभेत आगपाखड केली. बनावट स्टॅम्प प्रकरणात मी तेलगीला 'मोका' लावला; पण माझ्यावर आरोप होताच, तुम्ही (पवार) माझा राजीनामा घेतला; मग खैरनार यांनी आरोप केले, तेव्हा तुम्ही का राजीनामा दिला नाही? असा खडा सवाल भुजबळ यांनी पवारांना केला.

राजीनामा घेतला नसता, तर भुजबळ तुरुंगात गेले असते, असा प्रतिवाद पवार यांनी केला आहे; पण खैरनार यांच्या आरोपानंतर आपण राजीनामा का दिला नाही, या भुजबळ यांच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली आहे.

शरद पवार यांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश

भुजबळ यांनी पवारांच्या दुटप्पीपणाचाही पर्दाफाश केला. पवारांनीच आम्हाला केंद्राकडे (भाजप श्रेष्ठी) जायला सांगितले होते. एवढी मंत्रिपदे, आमदार, खासदार मागायचा सल्ला दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसमवेत आम्ही गेलो होतो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. पवारांचा असा मनसुबा असेल, तर मग अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली, त्यावर त्यांचा आक्षेप का, असा भुजबळ यांच्या म्हणण्याचा रोख. पहाटेचा शपथविधी गुगली होती, असे पवार म्हणतात. गुगली टाकून आपल्याच प्लेअरला कोणी आऊट करते का, असा चिमटाही त्यांनी काढला.

कुटुंबात भांडणे लावली

बीडमधील सभेत मंत्री धनंजय मुंडे यांनीही पवारांवर टीका केली. बीड जिल्ह्यासाठी पवारांनी काय केले, असा सवाल करीत पवारांनी आमच्या कुटुंबात भांडणे लावली, असाही आरोप त्यांनी केला.

भुजबळांनी पवारांवर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. तेलगी प्रकरणातील चार्जशीट अ‍ॅडिशनल अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी पाहिले. त्यांची आणि पवारांची चर्चा झाली. त्यानंतर सीबीआय चार्जशीटमधील भुजबळ पिता-पुत्रांची नावे रद्द झाली. अद़ृश्य हाताने ही नावे पुसली, असे सांगत पवारांनीच ती नावे काढली, असा संकेत त्यांनी दिला.

वळसे-पाटलांचा घरचा आहेर

मंत्री दिलीप वळसे-पाटील हे पवारांचे एकेकाळी स्वीय सहायक होते. प्रदीर्घ अनुभव असलेल्या वळसे-पाटील यांनी पवारांच्या राजकीय यश-अपयशाची चिरफाड केली आहे. पवारांना एकहाती सत्ता कधीही मिळवता आली नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. नंतर त्यांनी खुलासा केला, तरी त्यांच्या विधानातील सत्य अधोरेखितच होते.

आव्हाड-मुश्रीफ जुगलबंदी

पवारांनी कोल्हापुरात सभा घेतली, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. कोल्हापूरच्या गद्दारांना कोल्हापुरी पायताणाने ठेचले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावर मुश्रीफ यांनी प्रतिहल्ला चढवला. कोल्हापुरी नव्हे, तरी कापशी बसली म्हणजे समजेल, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर केले. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनीच संपवला, असेही ते म्हणाले.

आव्हाडांनी फडणवीस यांचे पाय धरले होते

आव्हाड यांनी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरले होते, असा गौप्यस्फोट बीडच्या सभेत मुश्रीफ यांनी केला. आव्हाड यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा त्यातून वाचण्यासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांना घेऊन ते फडणवीस यांना भेटले. तिथे ते फडणवीस यांच्या पाया पडले, असे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनीच ही माहिती दिल्याचे ते म्हणाले. (NCP Maharashtra)

कलगीतुर्‍याबरोबर राडाही

एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणारे एकमेकांवर वार करीत आहेत आणि एकमेकांच्या नेत्यांवर तोफ डागायला मागेपुढे पाहत नाहीत. दोन्ही गटांतील नेत्यांचे पडद्याआडचे कारनामे उजेडात येत आहेत. धोबीघाटावर धुणी धुतली जात आहेत. नेते मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आले आहेत, तर कार्यकर्ते, अनुयायी रस्त्यावर राडा करीत आहेत. पवार यांनी याआधी काँग्रेससह अन्य पक्षांतही फूट पाडली. आता त्यांना स्वपक्षातील उभी फूट आणि आपल्याच एकेकाळच्या सहकार्‍यांचा संघर्ष पाहण्याची वेळ आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT