Latest

NCP leader Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडीला घरघर, शरद पवारांचा आरोप

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेतून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी राज्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनाही जबाबदार धरले आहे. ते राज्यात आल्यानंतर आघाडीला घरघर लागल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची आम्हाला चिंता होती. त्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षे आघाडी होती. सरकारचा कारभार उत्तम आणि समन्वयाने चालला होता. तो तसा चालण्याचे श्रेय विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना होते. त्यांनी समजूतदार भूमिका घेतली. त्यामुळे फारसा खडखडाट न होता, तीव्र मतभेद न होता सरकार चालले.

पृथ्वीराज चव्हाण राज्यात आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यांची स्वच्छ प्रतिमा ही जमेची बाजू होती. परंतु, ते सर्वांना बरोबर घेऊन कारभार करतील का, याबाबत आमच्या मनात शंका होत्या. त्यामागे पृथ्वीराज चव्हाण यांची पार्श्वभूमी होती. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव आणि आई प्रमिलाताई यांचे काँग्रेसमधले स्थान मोठे होते. परंतु, त्यांचा सांधा यशवंतराव चव्हाण साहेब यांना मानणार्‍यांशी फारसा कधी जुळला नव्हता. विशेषतः चव्हाण साहेबांशी सहमती नसलेल्या लोकांशी त्यांच्या घरोबा अधिक होता. चव्हाण साहेबांचे आणि माझे संवादाचे नाते सर्वश्रुत आहे. त्याच्या परिणामी माझ्यासमवेतही पृथ्वीराज चव्हाण कुटुंब यांचे सूर फारसे कधी जुळलेले नव्हते. प्रत्यक्ष कोणता वाद व संघर्ष नसला तरी परस्पर मनमोकळा संवाद कधीच झाला नव्हता.

दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींच्या कलेने चालणारे अशीच पृथ्वीराज चव्हाण कुटुंबांची ओळख होती. त्यांची काँग्रेस श्रेष्ठी समवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करू शकेल, अशी आम्हाला सादर भीती होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरली. राष्ट्रवादी काँग्रेस आपला घटक आणि मित्रपक्ष या भूमिकेत थोडे अंतर पडायला सुरुवात झाली, असे शरद पवार यांनी नमूद केले आहे. सिंचनप्रकरणी विरोधकांनी अजित पवार यांच्याविरुद्ध आरोपाची राळ उठवली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपले पहिले लक्ष्य असल्याचे मानून पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली, असा आरोप शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे. (NCP leader Sharad Pawar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT