Latest

पुणे: शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे छातीत दुखू लागल्याने रुबी हॉलमध्ये दाखल

अमृता चौगुले

टाकळी हाजी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले चाणाक्ष ,अभ्यासू नेतृत्व, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सख्य असलेले आणि माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे निकटवर्तीय माजी आमदार पोपटराव गावडे यांना रविवारी ( दि.१९) दुपारी अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गावडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत सुधारली असल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही राजकीय,सामाजिक कार्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरून ते सतत समाजासाठी योगदान देत आहेत. रविवारी सकाळपासून पोपटराव गावडे हे कार्यक्रमात होते. मात्र, दुपारच्या वेळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, बिघडलेली प्रकृती बघून डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. वळसे पाटील यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय प्रशासनाला पोपटराव गावडे यांच्या प्रकृती विषयी कल्पना दिली आणि गावडे यांना शिरूरवरून रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हिरेमठ हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कुठलेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. अँजिओग्राफी करून त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. अनेक चाहत्यांनी गावडे लवकर बरे व्हावेत म्हणून देवाकडे साकडे घातले आहे.

SCROLL FOR NEXT