Latest

NCP Crisis : दोन पवारांच्या वकिलांची आयोगासमोर खडाजंगी

सोनाली जाधव

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रवादी काँग्रेसवरील हक्कासाठी बनावट दस्तावेज सादर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न म्हणजे निर्लज्ज फसवणूक असून, या फसवणुकीबद्दल अजित पवार गटाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सोमवारी (दि. २०) सुनावणीदरम्यान केली; तर ऐन निवडणूक काळात शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे जोरदार प्रत्युत्तर अजित पवार गटाने दिले. पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २४) होणार आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरील हक्कासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या कायदेशीर लढाईला दिवाळीनंतर पुन्हा सुरुवात झाली. आयोगासमोर दुपारी ४ वाजता सुनावणी अपेक्षित असताना; शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी हे उशिरा पोहोचल्याने जवळपास तासाभराच्या विलंबाने सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीसाठी स्वतः शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आयोगासमोर हजर होते; तर अजित पवार गटातर्फे खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, सूरज चव्हाणदेखील आयोगात पोहोचले होते. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सुनावणीसाठी पोहोचले होते.

NCP Crisis : दोन पवारांच्या वकिलांची आयोगासमोर खडाजंगी

शरद पवार गटाची बाजू मांडताना वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांमधील बनावटपणा याभोवती केंद्रित राहिला. सिंघवी यांच्यानंतर शरद पवार गटाची बाजू मांडणारे वकील देवदत कामत यांनी आयोगाकडे युक्तिवाद सुरू केला. तसेच सुनावणीची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तत्पूर्वी, सिंघवी यांनीही त्यांच्या युक्तिवादादरम्यान मुदतवाढीची मागणी केली होती. यावरून सिंघवी आणि अजित पवार गटातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची खडाजंगीही झाली.

फौजदारी गुन्हा दाखल करा: सिंघवी

पत्रकारांशी बोलताना अभिषेक सिंघवी यांनी सांगितले की, अजित पवार गटातर्फे सादर झालेली हजारो प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याने त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाच्या लेखी दस्तावेजांमधील बनावटपणा हा फसवणुकीच्या २४ निकांवर आधारित असल्याचाही दावा सिंघवी यांनी केला.

NCP Crisis : न्याय मिळण्याची अपेक्षा

सिंघवी म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना अजित पवार गटाने २६ ऑक्टोबरला चौधरी प्रतापसिंह यांचे समर्थन असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले, प्रत्यक्षात चौधरी प्रतापसिंह हे शरद पवार यांचे समर्थक असून, त्यांनी आज निवडणूक आयोगासमोर येऊन प्रतिज्ञापत्र सादर केले. अशा फसवणुकीची आयोगाने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, या मागणीचा पुनरुच्चार करताना सिंपवी यांनी अजित पवार गटाच्या बनावट दस्तावेजांपैकी केवळ नऊ हजार दस्तावेजांचाच दाखला दिला असल्याकडेही लक्ष वेधले. त्याचप्रमाणे अजित पवार गटाच्या एकाही प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार यांना विरोध करत असल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा करताना आयोगाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अजित पवार गटाचा युक्तिवाद २८ नोव्हेंबरला

ऐन निवडणुकीचा काळ असताना शरद पवार गटातर्फे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा सुरू असल्याचा दावा रोहतगी यांनी केला. अखेरीस निवडणूक आयोगाने सिंघवी यांना मागील युक्तिवादाचा दाखला देत तेच तेच मुद्दे पुन्हा मांडू नका, असे फटकारले. शुक्रवारी शरद पवार गटातर्फे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी (दि. २८) अजित पवार गट आपले म्हणणे मांडेल, असे मुकुल रोहतगी यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

NCP Crisis : पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला

• शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरूच
• एकूण कागदपत्रांपैकी ९ हजार कागदपत्रांचे दाखले
• वेळ वाढवून देण्याच्या मागणीस अजित पवार गटाचा विरोध
• फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची शरद पवार गटाची मागणी
• सुनावणीला शरद पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती
• अजित पवार गटाकडून प्रथमच पार्थ पवार यांची उपस्थिती
• तेच मुद्दे पुन्हा मांडू नका : शरद पवार गटाला आयोगाने फटकारले

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT