दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांत दिंडोरीतील राजकारणही वेगाने बदलत आहे. एकीकडे आमदार नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांना साथ दिली असताना, झिरवाळ यांना खऱ्या अर्थाने आमदार करणारे राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांनी आपले राजकीय गुरू शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तालुक्यातील राजकारण वेगळ्या दिशेने वाटचाल करत असून, राष्ट्रवादीतील फूट अटळ मानली जात आहे. (NCP Crisis)
दिंडोरी तालुक्याचे राजकारण गेली काही दशके श्रीराम शेटे यांच्याभोवती फिरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते जिल्ह्यातील सर्वात विश्वासू म्हणून ओळखले जातात. साहजिकच अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी श्रीराम शेटे या आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत पुढच्या वाटचालीसाठी तुमची साथ हवी, अशी साद घातली. शेटे यांनीही आपल्या गुरूंच्या पाठीशी उभे राहात आपली शक्ती उभी केली आहे. शेटे हे पवार यांचे निकटवर्तीय आहेतच तसेच शेटे यांनीच झिरवाळ यांना संधी देत आमदार केले हे सर्वश्रुत आहे.
झिरवाळ हे शेटेंच्या शब्दापुढे नाही, असा सर्वांचा समज आहे आणि त्याच दृष्टिकोनातून स्वतः पवार यांनीही शेटेंना विचारणा केल्याची वदंता आहे. मात्र विधानसभेत काम करताना अजित पवार यांची मिळणारी मदत किंवा त्यांच्यामुळे मिळालेल्या विधानसभा उपाध्यक्षपदाच्या उपकारातून बाहेर पडणे झिरवाळ यांना शक्य झाले नाही. त्यातच मतदारसंघातील अनेक मंजूर कामांना सरकारने स्थगिती दिली अन् सुरू असलेल्या कामांच्या निधीला कात्री लागल्याने झिरवाळ यांची मोठी कोंडी झाली होती.
राज्यातील राजकीय भूकंपानंतर गेले तीन-चार दिवस झिरवाळ यांना अज्ञातवासात काढावे लागले. आजच्या बैठकीनंतर झिरवाळ हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी तालुक्यातील त्यांचे गुरू शेटे यांनी आपल्या गुरूची साथ देण्याची भूमिका घेतल्याने झिरवाळ यांची मोठी कोंडी झाली आहे. झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मात्र या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या जुन्या गुरूंना साद घालतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
गट की, तडजोडी?
झिरवाळ यांच्या भूमिकेचे स्वागत काही युवकांनी केले असले, तरी बुजुर्ग मात्र शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांना अजित पवार गटाला दिंडोरी तालुक्यात उभारी देण्याचे मोठे आव्हान आपल्याच राजकीय गुरूला काटशह देत उभे करावे लागणार आहे. आगामी काळात तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट पडतात की, सोयीच्या तडजोडी होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तालुक्यातील श्रीराम शेटे यांच्यानंतरचे नेते गणपतराव पाटील व दत्तात्रेय पाटील हे कुणाच्या बाजूने कल देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे.
हेही वाचा :