अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस अमरावतीच्या दौर्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी आज अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे पवार यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे. त्यांच्या या भेटीने महायुतीत नाराज असलेले बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Sharad Pawar Meet Bachchu Kadu)
संबंधित बातम्या
दोन दिवस अमरावती दौर्यावर असलेल्या शरद पवार यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारत आज शरद पवार बच्चू कडूंच्या घरी पोहोचले.
याबाबत शरद पवारांना काल पत्र परिषदेत विचारल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. बच्चू कडू यांनी आपल्या घरी पाच मिनिटे चहा पिवून जा, असे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मी जाईन, असं शरद पवार म्हणाले होते.
बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहेत. अशावेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर शरद पवारांनी मी त्यांच्याकडे जातोय. यामागे काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून सांगितलं, असे शरद पवारांनी काल म्हटले होते. (Sharad Pawar Meet Bachchu Kadu)
गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचे दिसतात. बच्चू कडू यांनी शेतकरी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अनेकदा धारेवर धरल्याचेदेखील पहायला मिळाले आहे. दरम्यान, अशातच आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले आहे.
एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यावर जायला हवं. त्यांनी म्हणजे बच्चू कडू यांनी जाता-जाता माझ्याकडे चहासाठी या असं निमंत्रण दिलं, ते निमंत्रण मी स्वीकारलं असून तिथे जात आहे. मात्र, या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही असे पवार यांनी आधीच स्पष्ट केले होते. बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत, ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तुम्ही त्यांना घ्याल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, कशावरुन, तुमच्याकडे तशी माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला होता.
"आज कुरळपूर्णा येथील माझ्या निवासस्थानी शरद पवार साहेबांनी भेट दिली. स्व. आर. आर. पाटील आणि पवार साहेब यांच्या मदतीने ही मुंबई येथील मिल विदर्भात सुरू होऊ शकली. मदतीची जाणीव म्हणून पवारांना आमंत्रित केले व त्यांनी आमच्या विनंतीस मान दिला हा त्यांचा मोठेपणा आहे." अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी X वरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.