पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज ( Maryam Nawaz ) पाकिस्तानातील सर्वात मोठे राज्य अशी ओळख असणार्या पंजाबच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत, असे वृत्त पाकिस्तानमधील 'जिओ' न्यूजने दिले आहे. मरियम नवाज शरीफ यांना दोन तृतीयांश म्हणजेच एकूण 220 मते मिळाली. पाकिस्तानच्या इतिहासात पंजाब प्रांताच्या महिला मुख्यमंत्री निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दम्यान, इम्रान खान यांच्या पक्ष तेहरिक-ए-पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या सुन्नी इत्तेहाद परिषदेने (एसआयसी) या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझच्या नेत्या मरियम नवाज यांनी रविवारी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी अर्ज केला होता. पंजाब प्रांत पाकिस्तानात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. "पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी मरियम नवाझ शरीफ यांचे नामांकन अर्ज सादर करण्यात आले आहेत," असे पीएमएल-एनने 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या १.२ कोटींहून अधिक आहे. पंजाब विधानसभेत एकूण 337 निवडून आलेले आमदार आहेत.
पंजाबमधील मुख्यमंत्री निवडणुकीत इम्रान यांच्या पक्ष पीटीआयने 'सुन्नी इत्तेहाद कौन्सिल'शी हातमिळवणी केली होती. नवाझ शरीफ यांच्या जागी लष्कराने शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी बढती दिली. नवाझ शरीफ यांना पंतप्रधान होण्यासाठी आपली पावले मागे घ्यावी लागली, असे मानले जाते. मरियम नवाज यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याची घोषणा पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी केली. मरियन यांनी आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांनी वडील नवाझ शरीफ यांना दिले. मुख्यमंत्री झाल्यानंतर वडिलांचा वारसा पुढे चालवणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मरियम पंजाबच्या मुख्यमंत्री बनल्या असल्या तरी पडद्यामागे प्रत्येक निर्णय स्वतः नवाझ शरीफ घेतील, असे मानले जात आहे.