Latest

Navratri 2023 Kushmanda : दुर्गेचे चौथे रूप- कुष्मांडा

स्वालिया न. शिकलगार

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च । दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे ॥

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी (Navratri 2023 Kushmanda) असे म्हटले जाते. तिला कुष्मांड (कोहळा) बळी अधिक प्रिय आहे. (Navratri 2023 Kushmanda)

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अनाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.

तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भूजा आहेत. ही देवी अष्टभूजा या नावानेही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

SCROLL FOR NEXT