Latest

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सरहद संस्थेतर्फे कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने देण्यात येणार्‍या राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा 'राष्ट्रीय कारगिल गौरव' पुरस्काराने दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), शौर्यचक्र विजेते कर्नल वेंबू शंकर आणि शहनवाज शाह यांनाही 'राष्ट्रीय कारगिल गौरव' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे.

शनिवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे. सरहद संस्थेतर्फे कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्याचवेळी पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यंदा हा पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांना त्यांनी कारगिल युद्धाच्या दरम्यान केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आणि सियाचीनमध्ये 2001 साली जवानांसाठी रुग्णालयाची उभारणी करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रदान करण्यात येईल, तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे शौर्यचक्र विजेते कर्नल वेंबू शंकर, जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांमध्ये देशाप्रति निष्ठेची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करणारे शहनवाज शाह यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुण्यातील युद्ध स्मारकाच्या निर्मितीसाठी आयुष्य वेचणारे प्रकाश कर्दळे यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येईल, अशी माहिती सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर आणि जाहीद भट यांनी कळविली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT