Latest

National Games 2022 : तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राला पाचवे पदक

Arun Patil

अहमदाबाद, पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या युवा तिरंदाज कुणाल पवारने अटीतटीच्या लढतीत अचूक पद्धतीने एक्स मारून महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाचा (National Games 2022) बहुमान मिळवून दिला. यासह महाराष्ट्र पुरुष संघ रिकर्व्ह गटात कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र संघाने टाय झालेल्या लढतीमध्ये झारखंडला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने 28-26 ने सामना जिंकला. महाराष्ट्र संघाच्या विजयामध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाज शुकमणी बाबरेकर, गौरव लांबे आणि कुणाल पवार त्याचसोबत पार्थ साळुंके यांनी मोलाचे योगदान दिले. यासह या युवा तिरंदाजांनी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेत पाचवे पदक जिंकून दिले.

महाराष्ट्र संघाने रिकर्व्ह सांघिक गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यात कांस्यपदकासाठी अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांच्या युवा तिरंदाजाने तोडीस तोड कामगिरी करत तीन सेटमध्ये बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना टाय झाला. त्यानंतर सामन्याचा निकाल तीन रो मध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान कुणाल पवारने अचूक लक्ष्य भेदत एक्स मारला. त्यामुळे संघाला 28 गुणांची कामगिरी करता आली. यादरम्यान शुकमणी आणि गौरव लांबे यांनी मोलाचे योगदान दिले. मुख्य प्रशिक्षक शुभांगी रोकडे, प्रशिक्षक ज्ञानेश्वर थेटे, प्रतीक थेटे, प्रवीण सावंत, मोहम्मद झिशान आणि संघ व्यवस्थापक आर. बी. साळुंके, स्वप्निल भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली.

बॅडमिंटनमध्ये मालविका बनसोडला रौप्यपदक (National Games 2022)

बडोदा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या मालविका बनसोड हिने रौप्यपदक पटकावले. बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात मालविकाला रोमांचक सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आकर्शी कश्यप हिने मालविका बनसोडला 21-8 आणि 22-20 असे पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.

महाराष्ट्राचे सॉफ्टबॉल संघ सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार (National Games 2022)

गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सॉफ्टबॉल खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर सॉफ्टबॉल खेळात दबदबा निर्माण करणार्‍या महाराष्ट्र महिला व पुरुष संघांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आयआयटी गांधीनगर येथे सॉफ्टबॉल स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जळगाव येथे महिला व पुरुष संघांचे सराव शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात खेळाडूंचा कसून सराव करून घेण्यात आला. तसेच या शिबिरात सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांना तांत्रिक माहिती होण्यासाठी तसेच नियम व नियमावली बाबतीत असलेल्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सॉफ्टबॉलचे मुख्य पंच व तांत्रिक समितीचे प्रमुख मुकुल देशपांडे यांनी खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना नवे नियम आणि खेळाच्या विविध नियमांच्या बाबतीत चर्चात्मक संवादातून माहिती दिली. महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघासमवेत प्रशिक्षक किशोर चौधरी, पीयूष अबुलकर, शेख गुलजार, मिलिंद दर्प हे असून संघ व्यवस्थापक नितीन पाटील हे आहेत.

SCROLL FOR NEXT