Latest

National Games 2022 : डायव्हिंगमध्ये मेधालीला ‘सुवर्ण’

Arun Patil

अहमदाबाद, सुनील जगताप : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या मेधाली रेडकर हिने डायव्हिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने ब्राँझपदक पटकावित येथे तिसर्‍या पदकाची नोंद केली.

एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवीत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ती मुंबई येथे तुषार गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्यवसायाने फिजिओ असलेल्या या खेळाडूने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके जिंकली आहेत. सुवर्णपदक मिळवल्यानंतर मेधालीने सांगितले, राष्ट्रीय स्तरावर पहिले सुवर्णपदक मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.

ऋतिकाची पदकांची हॅट्ट्रिक

ऋतिका श्रीराम हिने येथे पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने याआधी या स्पर्धेत तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड व हाय बोर्ड प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. तिचे पती आणि आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू हरी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर तिने पुन्हा सराव सुरू केला.

शुक्रवारचे पदक विजेते : योगासन : वैभव श्रीरामे (सुवर्णपदक), छकुली सेलोकर (रौप्यपदक) डायव्हिंग : मेधाली रेडकर (सुवर्णपदक), ऋतिका श्रीराम (कांस्यपदक), ज्युदो : अपूर्वा पाटील (कांस्यपदक), जलतरण : महाराष्ट्र मिश्र संघ (रौप्यपदक)

योगासनात गोल्डन एन्ट्री

ऑरेंज सिटीच्या मालविका पाठोपाठ योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा पहिल्याच दिवशी गाजवली. नागपूरच्या या दोन योगापटूंनी शुक्रवारी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला दोन पदकांचा बहुमान मिळवून दिला.

एशियन चॅम्पियनशिपमधील गोल्ड मेडलिस्ट वैभव श्रीरामे पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदक विजेता ठरला. तसेच महिलांच्या पारंपरिक योगासनात नागपूरच्या छकुलीने रौप्य पदकाची कामगिरी केली. यासह महाराष्ट्र संघाने यंदा प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करण्यात आलेल्या योगासन प्रकारात गोल्डन एन्ट्री केली. तसेच नागपूरचे वैभव आणि छकुली राष्ट्रीय स्पर्धेच्या पदार्पणात पदकांचे मानकरी ठरले. मुख्य प्रशिक्षक संदेश खरे आणि संघ व्यवस्थापक सुहास पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.

महाराष्ट्राचे पदकांचे शतक; 26 सुवर्णांसह तिसर्‍या स्थानी

महाराष्ट्राने 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी पदकांचे शतक साजरे केले. यामध्ये 26 सुवर्णांसह 26 रौप्य आणि 48 कांस्यपदकांचा समावेश आहे. यास महाराष्ट्राने आपल्याच 2007 च्या कामगिरीला टाकले मागे. यादरम्यान महाराष्ट्र 97 पदकांसह स्पर्धेत आठव्या स्थानावर होता. आता महाराष्ट्र संघ 2022 मध्ये 100 पदकांसह पदक तालिकेत तिसर्‍या स्थानावर आहे.

ज्युदो : अपूर्वाला कांस्यपदक

गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युदोपटूंनी पदकांचे खाते उघडले. अपूर्वा महेश पाटील हिने 78 किलोपेक्षा अधिक वजन गटात कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राची ज्युदोपटू अपूर्वा पाटील हिने 78 पेक्षा अधिक किलो वजन गटात पहिल्या लढतीत मणिपूरच्या रोशनी देवीला पराभूत केले. दुसर्‍या लढतीत अपूर्वा पाटीलने तामिळनाडूच्या देवधर शनीला हरवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात अपूर्वा पाटीलला पंजाबच्या मनप्रीतकडून पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अपूर्वा पाटील ही कांस्यपदकाची लढत खेळली. त्यात अपूर्वा पाटील हिने मणिपूरच्या उमा चौहानला नमवून कांस्यपदक जिंकले.

अपराजित्व राखण्यासाठी हॉकी संघ सज्ज

राजकोट, पुढारी वृत्तसेवा : सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या महाराष्ट्र संघाला पुरुषांच्या हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीत झारखंड संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे शनिवारी होणार असून तो जिंकण्यासाठीच महाराष्ट्र संघ उतरणार आहे.

मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू असून आतापर्यंत झालेल्या साखळी गटातील सर्व सामने महाराष्ट्राने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान गुजरात संघाला 20-1 अशी धूळ चारली होती. अनेक ऑलिम्पिकपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या हरियाणा संघाला त्यांनी 3-1 असे पराभूत करीत आश्चर्यजनक निकाल नोंदविला होता. विशेष म्हणजे या सामन्यात बराच वेळ हरियाणाचा संघ 1-0 असा आघाडीवर होता. तथापि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी

जिगरबाज खेळ करीत विजयश्री खेचून आणली आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी पश्चिम बंगाल संघाला 2-0 असे पराभूत केले.

SCROLL FOR NEXT