Latest

National Game २०२२ : रोईंग : महाराष्ट्राने गाठली अंतिम फेरी

Arun Patil

अहमदाबाद, पुढारी वृत्तसेवा : सैन्य दलातील रोव्हर विपुल घरटे आणि ओंकार मस्के यांनी सर्वोत्तम कामगिरी करत 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेची (National Game २०२२) फायनल गाठली. यासह त्यांनी महाराष्ट्र रोईंग संघाचे पदक निश्चित केले. महाराष्ट्राच्या संघाने कॉकलेस पेयर्स गटात हे घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान गाठले. विपुल आणि ओंकारने दोन हजार मीटरचे अंतर 6 मिनिटे 44.2 सेकंदांत गाठले. आता या इव्हेंटची अंतिम फेरी सोमवारी रंगणार आहे.

प्रशिक्षक अंबादास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. यासह महाराष्ट्र संघ अंतिम फेरी गाठू शकला. त्या पाठोपाठ तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेश संघाने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. महाराष्ट्राच्या विपुल आणि ओंकार यांनी चांगली सुरुवात करून सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्यामुळे हिटमध्ये महाराष्ट्र संघाला स्थानावर धडक मारता आली.

पुरुष संघाचा सलग दुसरा विजय (National Game २०२२)

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खो-खो संघाने पुरुष गटात सलग दुसरा विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली आहे. दुसर्‍या सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने दिल्ली संघाचा एक डाव आणि 14 गुणांनी पराभव केला.

महिला खो-खो संघाची विजयी घोडदौड

महाराष्ट्र महिला खो-खो संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ओडिशा संघाचा 10 गुणांनी पराभव करून आगेकूच केली आहे. साखळीत दुसर्‍या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने ओडिशा संघावर 30-20 अशी 10 गुणांनी मात केली. महाराष्ट्र महिला संघाने सलग दुसरा विजय नोंदवत गटात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता महाराष्ट्र महिला संघाचा सामना रविवारी दुपारी 3.30 वाजता पंजाब संघाशी होणार आहे.

जिम्नॅस्टिक : महाराष्ट्र महिलांना कांस्य

अहमदाबाद : आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी असलेल्या महाराष्ट्र महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघाने शनिवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघाने 263.60 गुण संपादन करत तिसर्‍या स्थानावर धडक मारली. महाराष्ट्र संघाकडून श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, सिद्धी हत्तेकर, मानसी देशमुख, सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पदकाची कमाई करता आली. यासह महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिकमध्ये पदकाचे खाते उघडले. मुख्य प्रशिक्षक प्रवीण ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाला पदकाचा बहुमान मिळाला. या दरम्यान संघ व्यवस्थापक भक्ती तिवारी यांनी सहकार्य केले.

रुद्रांश-आर्या मिश्र दुहेरीत 13 व्या स्थानावर

सुवर्णपदक विजेता रुद्रांश पाटीलचा 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोल्डन धमाका उडवण्याचा प्रयत्न काहीसा अपयशी ठरला. रुद्रांश आणि आर्या बोरसे यांनी शनिवारी दहा मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्यांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. हे दोघेही पात्रता फेरीमध्ये तेराव्या स्थानावर राहिले. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT