नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे बुधवारी (दि.१३) जिल्ह्यात येत आहेत. मालेगाव, चांदवडमार्गे ते गुरुवारी (दि.१४) शहरात येतील. मात्र आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने त्यांची यात्रा आटोपती होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राहुल गांधी हे गुरुवारी व्दारका ते शालिमार असा रोड शो करणार असून त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार, मोखाडा येथून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.
खा. गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. आचारसंहिता लागू होणार असल्याने या यात्रेचा समारोप २० मार्चऐवजी चार ते पाच दिवस आधी करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठवड्यात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. १३ मार्चला यात्रा मालेगावमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर १४ मार्चला यात्रेचा ताफा शहरातील द्वारका सर्कल येथे येणार आहे. व्दारका उड्डाणपुलावरून त्यांचा ताफा खाली उतरेल. त्यानंतर खुल्या जीपमधून राहुल गांधी शालिमारपर्यंत रोड शो करतील. शालिमारला इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर राहुल गांधींचा ताफा काळाराम मंदिरात जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची यात्रा शहरात एक ते दीड तास राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर त्र्यंबकरोड मार्गे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने मार्गस्थ होईल. खा. गांधी हे त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर जव्हार, मोखाडा, पालघर मार्गे भारत जोडो यात्रा मुंबईत समारोपासाठी पोहोचणार आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे.
आज नियोजनासंदर्भात बैठक
राहुल गांधी यांच्या यात्रेसंदर्भात नियोजन करण्यासाठी शहर व जिल्हा कार्यकारीणीची बुधवारी (दि.६) बैठक होणार आहे. या बैठकीत यात्रेची अंतिम रुपरेषा ठरवली जाणार आहे. तसेच यात्रेचे सुक्ष्म नियोजन प्रदेश कार्यकारीणी करत आहे.