Latest

Nashik News : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवानायलॉनसह इतर घातक मांजा वापरावर बंदी घालून भयमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. घातक मांजा वापरण्यास २३ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे.

कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरात २३ जानेवारी २०२४ पर्यंत मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी साजरी होणार असल्याने शहरात आतापासून पतंग उडवण्यास सुरुवात झाली आहे. पतंग उडवताना काही जण नायलॉन मांजाचा वापर करीत असतात. मात्र या मांजामुळे पक्ष्यांची सर्वाधिक हानी होत असून, मनुष्यांनाही दुखापती होत आहे. मुंबईत नायलॉन मांजामुळे एका पोलिसाचा जीव गेल्याची घटना उघड झाली. तर पंचवटीत एका महिलेच्या चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार पोलिस ठाणेनिहाय गस्त सुरू असून, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. नयलॉनसह घातक मांजानिर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यावर प्रतिबंध लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये मनाई आदेश लागू असतील. कोणत्याही हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दुखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारी प्रस्तावित केली आहे.

१४ हजारांचा मांजा जप्त

सिडको परिसरातील भगतसिंग चौकात नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या तरुणाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. विराज संजय लोणारी (२३) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 'मोनो' नावाच्या मांजाचे १४ हजार रुपयांचे ३५ गट्टू जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

SCROLL FOR NEXT