Latest

Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 'रामराज्य' आणण्यासाठी नाशिकच्या पुण्यभूमीतून श्री काळारामाला साकडे घातले. श्री काळारामाचे सहकुटुंब दर्शन व पूजन केल्यानंतर ठाकरे यांनी शरयूच्या धर्तीवर रामकुंडावर गोदाआरतीही केली. शंखध्वनी, तुतारींचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसैनिकांच्या 'जय श्रीराम'घोषाने अवघा गोदाघाट भक्तिमय बनला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना इशारा दिला.

भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकाला भेट देत अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आगमन झाले. यावेळी पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस ठाकरे यांच्यासह काळारामाचे दर्शन घेत विधिवत पूजन केले आणि महाआरती केली. यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली. काळाराम मंदिराच्या ट्रस्टींकडून ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत, सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, खा. अरविंद सावंत, खा. प्रियंका चतुर्वेदी, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे, आ. अजय चौधरी, आ. सुनील राऊत आदींसह ठाकरे गटाचे प्रमुख नेतेगण यावेळी उपस्थित होते. काळाराम मंदिराच्या ट्रस्टींकडून यावेळी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ठाकरे रामकुंडावर गोदाआरतीसाठी रवाना झाले.

गोदाघाटावर मांगल्यमयी वातावरण

अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना आणि गोदाआरतीनिमित्त अवघा गोदाघाट परिसर सजविण्यात आला होता. गोदाघाटावरील मंदिरे आणि इमारती आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आल्या होत्या. रामकुंड परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. आपल्या पक्षप्रमुखाच्या स्वागताला हजर असलेल्या हजारो शिवसैनिकांनी गोदाघाटाला वेढा घातला होता. या ठिकाणी ठाकरे यांचे सहकुटुंब आगमन होताच शंख, तुतारीचा निनाद, ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आरती केली. विधिवत मंत्रोच्चाराने सुरुवातीला गोदामातेचे पूजन करण्यात आले. यानंतर ठाकरे यांच्यासह गोदाघाटावर जमलेले हजारो शिवसैनिक, भाविक आरतीत सहभागी झाले. आर्य सनातन हिंदू धर्म की जय, सियावर रामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे की जय, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, आवाज कुणाचा, शिवसेनेचा या घोषणांनी शिवसैनिकांनी अवघा गोदाघाट दणाणून सोडला होता.

वेशभूषेतून बाळासाहेबांची आठवण

१९९४ च्या राज्यव्यापी अधिवेशनाने शिवसेनेला १९९५ च्या निवडणुकीत राज्याची सत्ता मिळवून दिली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्वत: अधिवेशनाला उपस्थित होते. यंदा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्री काळारामाच्या दर्शनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वेशभूषा केली होती. ठाकरे यांनी परिधान केलेली भगवी वस्त्रे व गळ्यात घातलेल्या रुद्राक्षाच्या माळा लक्षवेधी ठरल्या.

मंदिर परिसरात होर्डिंग्जवॉर!

काळाराम मंदिर परिसरात भाजप विरुद्ध शिवसेनेचे ठाकरे गट असे होर्डिंग्जवॉर रंगल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी भाजपचे स्थानिक आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासह माजी नगरसेवकांनी अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले होते. त्याचप्रमाणे अयोध्येतील प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरही होर्डिंग्जची गर्दी होतीच. त्यामुळे ठाकरे गटाला याठिकाणी होर्डिंग्ज उभारताना मोठी कसरत करावी लागली.

आज राज्यस्तरीय अधिवेशन

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे सकाळी १० वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील दोन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT