Latest

Nashik News : पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या

गणेश सोनवणे

पालखेड मिरचीचे (जि. नाशिक); पुढारी वृत्ततसेवा ; निफाड तालुक्यात काल दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी दाटून येऊन वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात द्राक्ष उत्पादकांसह कांदा, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. लाखो रूपयांचे कर्ज काढून उभे केलेले द्राक्षपिक क्षणात जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला.

कालच्या घटनेने संपुर्ण "द्राक्षपंढरी" हादरून गेली आहे. पोटच्या पोराप्रमाणे जीव लावलेल्या पिकाची अशी क्षणात वाताहात होणे ही मनाला सुन्न करणारी घटना काल निफाड तालुक्यात घडली. निसर्गापुढे हातबल झालेल्या गारपीटग्रस्तांना धीर देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, दिलीप मोरे, प्रणव पवार आदिंसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील संतोष देवराम भंडारे, भारत राजाराम मोगल यांचे द्राक्षबागांची तर महेश भंडारे यांच्या कांदापिकाची पाहणी करत इतर घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी या काळात धीर धरून स्व:ताला सावरावे अशी विनंती या लोकप्रतिनिधींनी केली. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करत तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहे असे अाश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी,  देणार असेल तर तत्काळ मदत द्या ', पंचनामे करतो, समिती नेमतो हे न करता आम्ही आज संकटात सापडलो आहे. आज तत्काळ मदतीची गरज आहे असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला.

गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करत शासनाकडे तात्काळ अहवाल पाठवण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटिल, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटिल, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे आदींसह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सुरळीत विजपुरवठा द्या

तालुक्यातील शेतकर्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. यातून सावरणे शेतकर्यांना शक्य नाही. काही प्रमाणात उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना सुरळीत विजपुरवठा करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी विजवितरण कंपनीस दिल्या. विजबिलाअभावी काही ट्रान्सफार्मर बंद केले असतील तर ते तात्काळ सुरू करावे जेणेकरून शेतकर्यांना त्यांचा फायदा होईल. इतर ठिकाणचा विजपुरवठा कमी करून शेतकर्यांना जास्तीत जास्त विजेचा पुरवठा कसा देता येईल याकडे विजवितरण कंपनीने लक्ष द्यावे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT