Latest

Nashik MNS | महायुतीत अगोदरच तिढा त्यात मनसेला हवा मानपानाचा विडा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनदेखील विचारात घेतले जात नसल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देताना, 'बोलावलं, तरच प्रचारासाठी जा.' असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघांत मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांकडून मानपान दिला जात नसल्याचा आरोप करीत, प्रचारातून अलिप्ततेची भूमिका घेतली होती. अशीच स्थिती नाशिकमध्येही दिसत असून, महायुतीकडून विचारातच घेतले जात नसल्याची भावना मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बोलून दाखविली जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मनसेची यावेळी काय भूमिका असेल? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागून होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीचा भाग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. यावेळी मनसेकडून महायुतीकडे तीन जागांची मागणी केल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर घेतलेल्या मेळाव्यात महायुतीकडे कोणत्याही जागांची मागणी न करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा देशाची कमान दिली जावी, यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा घोषित केला होता. तसेच पाठिब्यांच्या काही दिवसांनंतर पत्रकार परिषद घेत, महायुतीच्या 'उमेदवाराने बाेलावलं, तरच प्रचाराला जा.' असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये मनसे आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये बिनसल्याचे वृत्त समोर आले. बहुतांश ठिकाणी महायुतीकडून मानपान दिला जात नसल्याच्या तक्रारी मनसे कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. आता अशीच काहीशी स्थिती नाशिकमध्ये असून, मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी बैठक घेत, नाशिक लाेकसभा मतदारसंघात मनसेची काय ताकद आहे, याचा पाढाच वाचला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराने सुमारे दोन लाख मते मिळविली होती. त्याच काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात तीन आमदार निवडून आले होते. २०१२ च्या मनपा निवडणुकीत ४० नगरसेवक मनसेचे होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मनसे उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती, असे असतानाही मनसेला कोणत्याही सभा, मेळावे, बैठकांना बोलावले जात नाही. युती धर्म म्हणून महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या नियोजनात सामावून घ्यायला हवे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली गेली. या बैठकीला मनोज घोडके, निखिल सरपोतदार, अमित गांगुर्डे, रोहन जगताप, संजय देवरे, किरण क्षीरसागर, सत्यम खंडाळे, नितीन धानापुणे, शशी चौधरी, बबलू ठाकूर, संतोष कोरडे, राकेश परदेशी, सौरभ खैरनार, अर्जुन वेताळ, देवचंद केदारे आदी उपस्थित होते.

महायुतीपासून पदाधिकारी लांबच

राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा अनेक पदाधिकाऱ्यांना रुचला नाही. नाशिकमध्येही बरेच पदाधिकारी या निर्णयामुळे दुखावलेले असून, महायुतीपासून अंतर राखून आहेत. अशात महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर, संभाव्य उमेदवाराकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कशी समजूत काढली जाईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार अन् लोकसभेसाठी तिसऱ्यांदा इच्छुक असलेल्या हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचार पत्रकावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध केल्याने, अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर मनसेला सोबत घेतले जाईल, याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT