Latest

Nashik | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आजपासून गोदा महोत्सव

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 6) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ विक्री विभागीय मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन शासनामार्फत केले जाते. यंदाच्या वर्षी विभागीय सरस महोत्सव व गोदा महोत्सव हा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. विभागीय मिनी सरस व गोदा महोत्सवात नाशिक विभागातील महिला स्वयंसाहाय्यता गटातील महिलांकडून उत्पादित केलेल्या दर्जेदार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान नाशिकच्या वतीने बचत गटांचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इट वाइजली, तत्त्व या ब्रँडच्या विविध वस्तूंची विक्री या महोत्सवात केली जाणार आहे.

दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी आयोजित गोदा महोत्सवांतर्गत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक अशा वस्तू व चविष्ट खाद्यपदार्थ नाशिककरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली. बचत गटांकडून उत्पादित केलेल्या दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थ योग्य दरात या महोत्सवात नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. बचतगटांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने नागरिकांनी गोदा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT