Latest

Nashik Goda Aarti : पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तूर्तास या सोहळ्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मोहोर उमटली नसली तरी जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. (Nashik Goda Aarti0

अयोध्यामध्ये येत्या २२ तारखेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी नाशिकमध्ये १२ जानेवारी रोजी हाेणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद‌्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या निमित्ताने नाशिकमध्ये गोदा आरतीचा (Nashik Goda Aarti)  शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे.

प्रभू श्रीरामांचे आणि नाशिकचे नाते अतूट नाते आहे. या कुंभनगरीतून दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरी अविरत प्रवाहित वाहते. राजा दशरथांच्या अस्थींचे विसर्जन ज्या पवित्र रामकुंडात झाले त्या रामकुंडावर वाराणसी तसेच हरिद्वारच्या धर्तीवर गोदा महाआरती करावी, अशी नाशिककरांची भावना आहे. गाेदा आरतीच्या माध्यमातून नाशिकचे जगभरात ब्रॅण्डिंग व्हावे या उद्देशाने २०१६ मध्ये सर्वप्रथम गोदा आरतीचा प्रस्ताव राज्यस्तरावर चर्चिला आहे. परंतु, आजपर्यंत ही संकल्पना सत्यात उतरलेली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्ताने गोदा आरती शुभारंभाची तयारी केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमातून गोदा आरतीचा सोहळा शक्य नसल्यास जाहीर सभेवेळी गोदा आरतीसाठी निधीची घोषणा मोदी करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

गोदा आरतीसाठी समिती गठीत (Nashik Goda Aarti)

राज्याच्या पर्यटन विभागाने २०१६ गोदा आरतीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी निधीही मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली. गोदा आरतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी निविदा काढण्यात आली. त्यामध्ये पर्यटन विकास महामंडळाकडून दोन ते अडीच किलोच्या ११ मोठ्या आरत्या, ताट, घंटेसह पूजेचे सर्व साहित्य हे पुरोहित संघाकडे दिले जाणार आहे. म्युझिक सिस्टीम, पुरोहितांना उभे राहण्यासाठी प्लॅटफॉर्म, सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्सची व्यवस्था असणार आहे. मात्र, आजही गोदा आरतीचा प्रकल्प सत्यात उतरला नाही.

SCROLL FOR NEXT