Latest

Nashik | टायपिंगच्या परीक्षेच्या एका जागेसाठी ५ जणांना संधी द्या – उमेदवारांची आग्रही मागणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) गेल्या वर्षी अराजपत्रिक गट क सेवेच्या सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबतच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्या असून, आता टंकलेखन कौशल्य चाचणी बाकी आहे. या चाचणीसाठी १ जागेसाठी ३ या प्रमाणात उमेदवार बोलावण्यात येतात. मात्र यंदा अनेक संवर्गांच्या परीक्षा झाल्याने १ जागेसाठी ५ म्हणजेच १:५ प्रमाणात उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलवावे, अशी आग्रही मागणी स्पर्धा परीक्षेचे उमेदवार करत आहेत. यासाठी मेल आणि ट्विटर वॉर सुरू करण्यात आले आहे. (Mail and Twitter War)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये झाली. मुख्य परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे कोणत्याही दिवशी पुढील टंकलेखन पात्रता चाचणीसाठी (Typing qualification) निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरात लवकर आयोगाकडे मागणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्टिटरवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत खात्याला टॅग करत संदेश लिहीत आहेत तसेच आयोगाच्या मेल आयडीवर प्रत्येक उमेदवार मेल लिहीत आहे.

मेल आणि ट्विटसाठी स्वतंत्र कंटेंट तयार करण्यात आला असून, त्याचा वापर उमेदवार करत आहेत. प्रामुख्याने सोशल मीडियाचा प्रभाव पडेल, असे चित्र यामध्ये दिसून येत आहे. उमेदवारांनी मेलमध्ये राज्य लोकसे‌वा आयोगासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनादेखील जोडले आहे. तसेच व्टिटमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकृत खात्यालाही टॅग करत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी जागा कमी असल्याने आयोगाने १:३ प्रमाणात विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी घेतली होती. यंदा मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वतीने सरळसेवा माध्यमातून विविध विभागांच्या हजारो जागांची भरती प्रक्रिया राबवली गेली. त्यामध्ये अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांमधून अनेक उमेदवार या पात्रता परीक्षेला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोगाने जर १:५ या प्रमाणात उमेदवारांना बोलावले, तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळेल, अशी मागणी अनेक संस्था करत आहेत.

हे आहेत हॅशटॅग
ट्विट करत असताना उमेदवार #mpsc, #ratio #cleark यांचा वापर करत आहेत. तर मेलमध्ये एक पत्रच उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT