ओझर: पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव येथे आज होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून ताब्यात घेत निफाडला अज्ञातस्थळी नजरकैदेत स्थानबद्ध केले.
आज (दि. १५) पिंपळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत त्यांना पुर्वीच्या विविध आश्वासनांबाबत हे शिवसैनिक विचारणा करणार होते. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीबाबत ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी खंडू बोडके-पाटील यांनी पोलिसांकडे केली होती. ग्रामीण पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी दूरध्वनीद्वारे माजी आमदार अनिल कदम, तालुकाप्रमुख सुधीर कराड यांच्याशी याबाबत चर्चा केली. मात्र सभेत जाब विचारण्यावर ठाम असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अखेर स्थानबद्ध केले. स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांची सायंकाळी कदम यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघात उमटले पडसाद
पोलिसांच्या कारवाईचे पडसाद संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात उमटले. कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा, त्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात फिरू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. मोदींची सर्वत्र हुकूमशाही सुरू असून लोकशाही मार्गाने आम्ही उद्याच्या सभेत त्यांना त्यांच्याच आश्वासनांची आठवण करून देत जाब विचारणार होतो. मात्र पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने दडपशाही करत आम्हाला सकाळपासून ताब्यात घेतले आहे. खासदार भारती पवार यांचा पराभव अटळ असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. – खंडू बोडके पाटील, माजी सरपंच करंजगाव.
हेही वाचा: