Latest

Nashik Fire News | आग विझविताना अग्निशामक बाटलीचा स्फोट; रेल्वे कर्मचारी जखमी

अंजली राऊत

मनमाड : पुढारी वृत्तसेवा
कारखान्यात लागलेली आग विझविताना अग्निशामक बाटलीचा (एक्सटिंग्विशर) स्फोट होऊन एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना मनमाडच्या प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या रेल्वेच्या ब्रिटिशकालीन कारखान्यात घडली. हेमंत सांगळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, फायर बाटली रिफिलिंग व्यवस्थितपणे झाले नसल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ब्रिटिशकालीन रेल्वेचा इंजिनियरिंग कारखाना असून, त्यात रेल्वे पूल बांधण्यासाठी लागणारे गर्डर, नट बोल्ट, फिशप्लेट यासह इतर साहित्य सामग्री तयार केली जाते. देश आणि रेल्वेसाठी हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे कारखाना परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या कारखान्यात अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. मंगळवारी (दि.२३) कारखान्यात एका ठिकाणी आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी फायर बाटल्यांचा (एक्सटिंग्विशर) वापर करीत असताना एका बाटलीचा कर्मचाऱ्याच्या हातातच स्फोट होऊन त्यात हेमंत सांगळे हे जखमी झालेत. या अनपेक्षित घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये वर्ग करण्यात आले.

इतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीचे कारण अस्पष्ट असून, वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, आग आणि फायर बाटलीचा स्फोट या दोन्ही घटनांची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT