नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
अर्थमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही. माझा नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आहे. त्यांच्या भल्यासाठी काम करायचं आहे. नाशिक जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. नाशिक शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याचा मानस आहे. गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करु असे अजित पवार म्हणाले.
नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले, नाशिक जिल्हा मिनीमहाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलो. नाशिकरांनी उत्साहाने स्वागत केले आनंद झाला, सर्वांचे धन्यवाद. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अडचणीत आहे, आजपर्यंत बॅंकेचा नावलौकीक होता. मात्र काही कारणांनी बॅंक अडचणीत आली आहे. नाशिक जिल्ह्यात 112 शिबीरे झाली, त्यात 11 लाखपेक्षा जास्त लोकांना फायदा मिळाला. मात्र आपल्यावर थोडं संकट आलय. सध्या 15 जुलै निघालाय तरी पाऊस नाही, पेरण्या नाही. महाराष्ट्रात धरणाची परिस्थिती बिकट आहे. तेव्हा आम्ही काळजीत आहोत, पांडुरंगाला पावसासाठी साकडं घालतो. कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास घाबरु नका, महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील. पंतप्रधानांना भेटून आपण मदत घेऊ असे अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत आहे. विदेशात देशाचे नाव झाले. कालच देशाने चांद्रयान मोहीम यशस्वी केली. महासत्ता म्हणून आपली आगेकूच होत आहे. असे अजित पवार म्हणाले.
आता या सरकारमध्ये तिसरं इंजिन सहभागी झालय. हे सरकार दोन इंजिन नाही तर तीन इंजिनच सरकार आहे. असेही अजित पवार म्हणाले.