Latest

Nashik Crime Upadete News | आर्थिक कारण, व्हायरल पत्रकामुळे डॉक्टरवर प्राणघातक हल्ला

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉ. कैलास जगदीश राठी (४८) यांच्यावर शुक्रवारी (दि.२३) रात्री एकाने कोयत्याने सपासप वार करीत प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित दाम्पत्यास पकडले आहे. दरम्यान, आर्थिक कारणातून संशयिताने डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच संशयित राहत असलेल्या सोमवार पेठ परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्र व्हायरल झाल्याने राठींवर हल्ला झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.

सुयोग हॉस्पिटल येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास संशयित राजेंद्र चंद्रकांत मोरे याने डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला केला. डॉ. राठी यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पंचवटीतील अपोलाे रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पत्नीने पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित राजेंद्र मोरेविरोधात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, दोन महिलांनी सुयोग रुग्णालयात नोकरीस असताना सुमारे सहा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले हाेते. चौकशी नंतर एकीस कामावरून काढण्यात आले होते. तिने विनंती केल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा कामावर घेत तिच्याकडे अन्य जबाबदारी देण्यात आली. या कालावधीत महिलेने डॉक्टर राठींकडून जमीन कामकाजासाठी १२ लाख रुपये घेतल्याचे समजते. त्यामुळे डॉ. राठी हे महिलेकडे १८ लाख रुपयांची मागणी करीत होते. या वादातून संशयित राजेंद्रने डॉक्टरांवर हल्ला केला. पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी पथक नेमून संशयित राजेंद्र यास अटक करत चौकशी सुरु केली आहे.

आक्षेपार्ह मजकूराचे पत्रक
पोलिसांच्या तपासात सोमवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्र व्हायरल झाले होते. यामुळे हे पत्र डॉ. राठी यांनी व्हायरल केल्याचा संशय संशयित राजेंद्र यास होता. पत्र हाती आल्यानंतर संतापाच्या भरात हल्ला केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरु केला आहे.

कठोर कारवाईची मागणी
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोशिएशनने (आयएमए) शनिवारी (दि.२४) पहाटे ते दुपारी बारापर्यंत रुग्णसेवा बंद ठेवली. हल्ल्याचे कारण उघड झाल्यानंतर रुग्णसेवा पूर्ववत करण्यात आली. बैठकीत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड उपस्थित होते. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयात पेट्रोलिंग करावी. डॉ. राठी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आयएमए नाशिक चॅप्टरने केली. हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मारवाडी राजस्थानी माहेश्वरी व जैन समाजाने पोलिस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी माहेश्वरी विद्यार्थी भवनचे अध्यक्ष अशोक तापडिया, गुणवंत मनियार, सुरेश केला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. राठी यांच्यावर रुग्णालयात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध आयएमएकडून करण्यात आला आहे. त्यांच्यावरील हल्ला वैयक्तिक आर्थिक कारणांतून झाल्याने रुग्णसेवा पुर्वव्रत करण्यात आली. याबाबत, रुग्णालय व डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांसोबत चर्चा केली असून त्यांच्याकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. – डॉ. विशाल गुंजाळ, अध्यक्ष, आयएमए.

डॉक्टरवरील हल्ल्यातील संशयितास अटक केली आहे. हा हल्ला वैद्यकीय व्यवसायातील कारणातून झालेला नाही. डॉक्टरसोबत संशयिताचे आर्थिक व्यवहारातून वाद असल्याचे समोर आले आहे. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त.

SCROLL FOR NEXT