Latest

Nashik Cold News : महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या पाऱ्यातील घसरण कायम आहे. शहरात मंगळवारी (दि.१६) ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे हवेतील गारठा वाढला आहे. दुसरीकडे निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ झाली आहे. 

उत्तरेमधील बर्फवृष्टी व पाऱ्यातील घसरणीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिक शहर व परिसरावर पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. परिणामी पहाटेचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत आहे. तसेच दिवसभर व रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक जाणवत असल्याने नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करत आहेत.

गेल्या २४ तासांत निफाडच्या तापमानात एक अंशाची वाढ होत पारा ७.४ अंशांवर स्थिरावला. मात्र, हवेतील गारवा कायम आहे. थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षबागांना फटका बसण्याची दाट भीती आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाला आहे. द्राक्षपीक वाचविण्यासाठी शेतकरी पहाटे बागांमध्ये शेकोट्या पेटविण्यासह द्राक्षघडांना कापडाने व कागदाचे वेष्टण घालत आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या अन्य भागातही थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंडी

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी असून महाबळेश्वरमधील किमान तापमान 14.7 अंश सेल्सियस नोंदविले गेले. त्याचवेळी  नाशिकमध्ये ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

SCROLL FOR NEXT