Latest

नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जाहिरातीसाठी तसेच विद्युत रोषणाईसाठी झाडांवर खिळे ठाेकून त्यांना इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणी झाडांवर खिळे ठोकल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील झाडांची पाहणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली.

महापालिकेकडूनही दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडांची लागवड केली जाते. मात्र, काही फुकटे या झाडांवर फलक-बॅनर लावणे, विद्युत रोषणाईकरून स्वत:ची जाहिरात करतात. अनेकजण झाडांना इजा पोहोचवतात. झाडांना त्रास होईल, असे कृत्य केले जात आहे. यामुळे झाडांची हानी होत असून, याविरोधात उद्यान विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रो वेल्थ एजन्सीने शहरातील अनेक रस्त्यांवर एनए प्लाॅट विकणे असल्याचे फलक झाडांना खिळे ठोकून जाहिरात केली आहे. तसेच हाॅटेल पीवर ग्रीन ऑल लिव्हज, रेड चिली, दि क्लिस्टो मल्टी कझीन व बाॅबीज हाॅटेल यांनी झाडांवर विद्युत रोषणाई करून स्वत:ची जाहिरात केली आहे. तर काॅलेजरोड येथील क्रोमा शोरूमनेदेखील झाडांवर जाहिरात केली आहे. झाडांचा वापर करून स्वत:च्या व्यवसायाची जाहिरात केल्याप्रकरणी सातपूर उद्यान निरीक्षकांनी सबंधितांना नोटिसा बजावत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काही कंपन्या, राजकीय पक्ष किंवा व्यक्ती, जाहिरातदार हे झाडांवर खिळे ठोकून तसेच फलक, भित्तिपत्रके व जाहिराती लावतात. यामुळे झाडांचे नुकसान होते. झाडांना इजा पोहोचते व शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचून विद्रूपीकरण होते. यापुढे असे प्रकार आढळल्यास कठोेर कारवाईचा इशारा उद्यान विभागाने दिला ‍आहे.

जाहिरातीसाठी झाडांचा उपयोग केल्याने जाहिरात एजन्सी व हाॅटेलचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. यापुढे असे कृत्य सहन केले जाणार नसून कठोेर कारवाई केली जाईल.

– विजयकुमार मुंढे, उपआयुक्त , उद्यान विभाग, मनपा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT