Latest

Supersonic aircraft : नासा लवकरच तयार करणार सुपरसॉनिक विमान

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : कल्पना करा की, तुम्ही न्यूयॉर्क ते लंडन हा साडेसात तासांचा प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण करणार आहात… लवकरच ही कल्पना वास्तवात उतरणार असून त्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या संभाव्य सुपरसॉनिकविमानाचा वेग ध्वनीपेक्षा चौपट असणार आहे.

ध्वनीच्या चौपट वेगाने भरारी घेणारे विमान तयार करता येईल काय आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, यावर नासाने काम सुरू केले आहे. या संभाव्य विमानाचा तपशील नासाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सादर केला आहे. त्यानुसार या विमानाचा वेग सध्याच्या विमानापेक्षा पाचपट जास्त असेल. आकड्यांत सांगायचे तर किमान वेग ताशी 2470 किमी (मॅक 2) आणि कमाल वेग ताशी 4900 किमी (मॅक 4) असेल. न्यूयॉर्क ते लंडन हे 5566 किमी अंतर पार करण्यासाठी सध्याच्या विमानाला सुमारे साडेसात तास लागतात. नासाने तयार केलेले नवे विमान हेच अंतर केवळ दीड तासात पार करेल.

संभाव्य मार्गांचा अभ्यास

हे विमान कोणकोणत्या मार्गांवरून प्रवास करू शकेल, याचा अभ्यासही नासाने पूर्ण केला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर अटलांटिक मार्ग आणि पॅसिफिक महासागर ओलांडणार्‍या ट्रान्ससॉनिक मार्गांचाही समावेश आहे.
थोडक्यात सांगायचे तर या संभाव्य नव्या विमानामुळे हवाई प्रवासात क्रांती घडणार आहे.

विशेष सुपरसॉनिक तंत्राचा वापर

एक्स 59 नावाचे हे विमान विशेष सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या आधारे साकारणार आहे. कोणत्याही विमान प्रवासात यंत्रांचा आवाज मोठ्याने येत असल्यामुळे काही प्रवासी तर कानांत कापसाचे बोळे घालणे पसंत करतात. नासाकडून तयार होऊ घातलेल्या या अत्याधुनिक विमानाचा आवाज तर कर्णकर्कश असेल, अशी कोणाचीही धारणा असू शकते. तथापि, या आवाजाची पातळी किमान पातळीवर आणण्यासाठीच खास तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT