Latest

सूर्यग्रहणावेळी अंधार पडताच ‘नासा’ सोडणार तीन रॉकेटस्

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये 8 एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यावेळी काही मिनिटांसाठी अंधार पडल्यावर 'नासा' तीन रॉकेटस् सोडणार आहे. हे तिन्ही रॉकेटस् ग्रहणाच्या छायेत लाँच केले जातील. सूर्याचा प्रकाश अचानक कमी झाल्यावर वातावरणावर कोणता परिणाम होतो, हे यामधून पाहिले जाईल. विशेषतः, वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या स्तरादरम्यान असलेल्या आयनमंडळावर होणारा परिणाम या प्रयोगातून अभ्यासला जाईल.

सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र एकाच सरळ रेषेत आल्यावर सूर्य झाकोळला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडून असा अंधार पडतो. दिवसाच्या वेळीच अचानक रात्र झाल्यासारखा अंधार पडल्यावर तापमानातही वेगाने घट होते. तसेच प्राण्यांचे वर्तनही रात्रीच्या वेळेसारखे होऊ लागते. पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरावर सूर्यग्रहणाच्या या छायेचा कोणता परिणाम होतो, हे अद्याप समजलेले नाही. या प्रयोगातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या स्तरांमधील सीमारेषेवर कोणता प्रभाव पडतो हे जाणून घेतले जाईल.

वरच्या आणि खालच्या वातावरणाच्या मध्ये असलेल्या स्तराला 'आयनमंडळ' म्हटले जाते. ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 90 ते 500 किलोमीटरदरम्यान फैलावलेले आहे. आयनमंडळात सूर्यापासून येणारी अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सातत्याने अणूंपासून इलेक्ट्रॉन्स दूर नेतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युतभारित कण बनतात, जे वरच्या स्तरातील वातावरणाचा विस्तार करतात. सूर्यास्तावेळी आयनमंडळ पातळ म्हणजे कमी जाडीचे होते. याचे कारण म्हणजे आयन न्यूट्रल अणूंमध्ये पुन्हा जोडले जातात आणि पुढच्या सकाळी पुन्हा ही प्रक्रिया होते.

आयनमंडळाला एखाद्या तलावाची उपमा दिली, तर त्यामध्ये हलक्या लहरी उठत असतात. ज्यावेळी सूर्यग्रहण होते त्यावेळी अशी स्थिती बनते की, एखादी मोटारबोट तलावाच्या पाण्याला कापत पुढे जात आहे. काही वेळासाठी बोटीच्या खाली व मागे थोडी जागा रिकामी होते, बाजूचा जलस्तर वाढतो आणि नंतर पुन्हा पाणी आपल्या जागेवर येते. 8 एप्रिलला ज्यावेळी सूर्यग्रहणाची सुरुवात होईल आणि अंधार पडू लागेल, त्यावेळी 'नासा'चे पहिले रॉकेट सोडले जाईल. काही मिनिटांनंतर दुसरे व अंधार हटल्यानंतर तिसरे रॉकेट सोडले जाईल. हे तिन्ही रॉकेटस् इतका डेटा पाठवतील की, संशोधक आयनमंडळातील व्यत्यय समजू शकतील. अशा व्यत्ययामुळे रेडिओ आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन्समध्ये अडथळे येतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT